जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यात यंदा खरिपाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. 50 हजार हेक्टरवर तुर, उडीद, सोयाबीन या पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा तुरीवर वांझ रोग, उडीद आणि सोयाबीनवर केसाळ आळी आणि तंबाखूचे पानं खाणार्या आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. खरिप पिकांवर आलेल्या या संकटापासून संरक्षण व्हावे यासाठी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर आणि त्यांची टीम गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
जामखेड तालुक्यात यंदा 10 हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मात्र यावर्षी जामखेड तालुक्यात तुर पिकांवर वांझ रोगाचे संकट घोंघावू लागले आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा सुध्दा वांझ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे तुर उत्पादक शेतकरी बांधवांच्या चिंता वाढल्या आहे.
वांझ रोगाच्या संकटापासून वाचण्यासाठी जामखेड तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर आणि त्यांच्या टीमने वेगाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. स्वता : कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
आज जामखेड तालुक्यातील हळगाव येथे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी तुर, उडीद, सोयाबीन पिकांच्या शेतांना भेटी दिल्या. वांझ रोगापासून तुरीच्या पिकाचा कसा बचाव करायचा त्याचबरोबर केसाळ आळ्यांपासून उडीद आणि सोयाबीन पिकांचा कसा बचाव करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी जेष्ठ नेते किसनराव ढवळे, राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते शरद ढवळे, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब वाघमारे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्माचे तुषार गोलेकर, किसन ढवळे,सह आदी शेतकरी उपस्थित होते.
तुुर पिकावरील वांझ रोगाचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…!
वांझ रोगाची लक्षणे असलेली तुरीचे झाड कसे ओळखायचे ?
आपल्या शेतातील वांझ रोगाची लागण झालेली तुरीची झाडे ओळखायची असतील तर शेतकरी बांधवांनी आपल्या शेताचा सर्वे करणे आवश्यक आहे. सर्वे करताना तुरीच्या पिकातील पिवळसर झालेली झाडे, आखूड पानाची झाडे, बारिक पानं असलेली झाडे,कमी वाढ झालेली झाडे, पॅचेस दिसणारी झाडे दिसल्यास ती झाडे वांझ रोगाला बळी पडली आहेत हे समजावे.
वांझ रोगाची लक्षणे असलेली तुरीचे झाड आढळल्यास काय करावे ?
वांझ रोगाने बाधित झालेल्या झाडांचा प्रादुर्भाव 500 अंतरावरील पिकांना होतो. त्यामुळे अशी रोगग्रस्त झाडे शेतातच उपटून टाकू नयेत. तुरीच्या शेताचा सर्वे करताना वांझ रोगाने बाधित झालेली झाडे तत्काळ उपटून एका गोणीत जमा करावीत आणि जाळून टाकावीत अन्यथा ती जमिनीत पुरावीत.हा या रोगापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यानंतर फवारणी करणे आवश्यक आहे.
केसाळ आळीपासुन पिकाचे संरक्षण कसे करावे
जामखेड तालुक्यात 34 हजार हेक्टर क्षेत्रावर उडदाची तर 10 ते 11 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. उडीद आणि सोयाबीनवर केसाळ आळी आणि तंबाखूचे पानं खाणारी आळी याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. आळ्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. पिकांचे सर्वेक्षण करताना शेतातील दहा ते वीस झाडांवर मोठ्या प्रमाणात लहान अवस्थेतील आळ्या आढळून येत आहेत. ती झाडे तातडीने उपटून टाकल्यास शेतात या आळ्या पसरण्यापासून आपण वाचू शकतो. यातून पिकाचे नुकसान टाळता येईल.
कृषी विभागाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे अवाहन
जामखेड तालुक्यात यंदा तुर, उडीद, सोयाबीन ही पिके तरारून आली आली आहेत. तुर पिकावर वांझ रोगाचा प्रादुर्भाव तसेच उडीद आणि सोयाबीनवर केसाळ आळीचा प्रादुर्भाव आहे. या संकटातून पिके वाचवण्यासाठी कृषी विभाग बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमांतून सुध्दा जनजागृती केली जात आहे. कृषी विभागाने दिलेल्या सूचनांची तालुक्यातील शेतकरी बांधवांनी तातडीने अंमलबजावणी करावी आणि होणारे नुकसान टाळावे असे अवाहन जामखेड तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.
पहा : तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची तुर पिकावरील वांझ रोग व्यवस्थापनाबाबतची सविस्तर मुलाखत ⤵️