MLA Suresh Dhas | सुरेश धस यांच्यावर आरोप होताच आक्रमक झालेल्या धस समर्थकांनी केला विरोधकांवर पलटवार

ब्लॅकमेलरच्या माध्यमांतून धस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | विधानपरिषदेतील भाजपचे आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी वक्फ बोर्ड आणि देवस्थान ट्रस्टच्या आष्टी तालुक्यातील जमीनी लाटून एक हजार कोटींचा गैरव्यवहार केला असा गंभीर आरोप झाल्याने राजकीय धुराळा उडू लागला आहे.

आमदार सुरेश धस यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आष्टी – पाटोदा – शिरूर मतदारसंघातील धस समर्थक नेते मैदानात उतरले आहेत. भारत मुरकुटे, अमर निंबाळकर, प्रकाश कवठेकर, माऊली जरांगे, बळी पोटे, सय्यद अब्दुला या समर्थकांनी धस यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट धस यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत धुराळा उडवून दिला आहे.

आमदार सुरेश धस यांच्यावर झालेल्या आरोपांवर धस समर्थकांनी जोरदार पलटवार करत आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायत निवडणूकांमध्ये सुरेश धस यांच्या बाजूने जनमताचा कौल असल्यामुळे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन विरोधकांनी आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे.ज्या सामाजिक कार्यकर्त्याने धस यांच्यावर आरोप केले आहेत तो गुंड प्रवृत्तींचा ब्लॅकमेलर आहे. बलात्कारासह महिलांवर अत्याचाराचे त्याचे पाप सगळ्या जनतेला माहित आहेत असा गंभीर आरोप धस समर्थकांनी केला आहे.

आमदार सुरेश धस हे काही ५ – १० वर्षांतील नेते नाहीत, जनसामान्यांच्या विश्वासावर व विकासामुळे गेल्या २५ वर्षांपासून जनमताने स्वीकारलेले नेतृत्व आहेत. कर्हेवाडी मधील इनामी जमीनी कुणी विकल्या? दादेगावच्या श्री रामचंद्र देवस्थानची ३५० एकर जमिन कोण खात आहे? हे या ब्लॅकमेलरने जनतेला जरा सांगावे असा रोखठोक सवाल धस समर्थकांनी केला आहे. (Who eats 350 acres land of Dadegaon temple? Criticism of Dhas supporters)

नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदानापूर्वीच पराभव होत असल्याचा अंदाज आल्यामुळे बैचेन झालेल्या लोकांनी आ सुरेश अण्णा धस यांच्यावर आरोप करण्याचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न सुपारीबहाद्दर लोकांच्या माध्यमांतून केलेला आहे. असा आरोप धस समर्थकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

धस यांच्या बदनामीचा फायदा नगरपंचायत निवडणुकीत होईल अशी भाबडी आशा विरोधकांना व जळफळाट झालेल्यांना आहे मात्र जनता हा कथित व बदनाम करण्याचा सुरु असलेला प्रयत्न चांगल्या प्रकारे ओळखते. हा आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रयत्न आहे. अशा बिनबुडाच्या आरोपावर आमच्या नेतृत्वाला बोलण्याची देखील आवश्यकता नसून आम्हीच आमच्या नेतृत्वाच्या परस्पर सांगू इच्छितो कि याबाबत कोणतीही चौकशी लावायची असेल ती लावावी, ज्यांना कर नाही त्यांना डर देखील नसतो, मात्र ऐन निवडणुकीत असले बिनबुडाचे आरोप व घाणेरडे राजकारण हे ब्लॅकमेलर लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन करणाऱ्यांना बीड जिल्ह्यातील जनता व मतदार कधीही माफ करणार नाही हिंमतच नसेल तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची आवश्यकताच नव्हती असाही टोला प्रसिद्धिपत्रकात लगावला आहे.

ज्या कथित व ब्लॅकमेलर सामाजिक कार्यकर्त्यांकडे उत्पन्नाचा कसलाही सोर्स नाही ती व्यक्ती चारचाकी गाडीमध्ये कशी फिरते? विद्यमान लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संधान साधून जे नथीतून तिर मारण्याचा प्रयत्न झाला आहे तो जनताच हाणून पाडणार आहे. असे कितीही बिनबुडाचे आरोप विरोधकांनी ब्लॅकमेलर लोकांच्या माध्यमातून केले तरी जनता आमदार सुरेश अण्णा धस यांच्या पाठीशी होती,आहे व यापुढेही राहणार असल्याचा दावा भारत मुरकुटे, अमर निंबाळकर, प्रकाश कवठेकर, माऊली जरांगे, बळी पोटे, सय्यद अब्दुला या धस समर्थकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.