देवस्थान जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया : धस म्हणाले दोषी असेल तर जेलमध्ये टाका
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान आणि वक्फ जमिनींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एक हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत धस यांच्या विरोधात ईडीकडे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या संपुर्ण प्रकरणावर आमदार सुरेश धस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सुरेश धसांनी शिरूर तालुक्यातील एका राजकीय कार्यक्रमात या प्रकरणावर जाहिर भूमिका मांडली आहे.
यावेळी बोलताना धस म्हणाले की, सर्वसामान्य कुटूंबातून मी राजकारणात आलो, देवस्थान जमीन प्रकरणांत एक हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप आपल्यावर करण्यात आला, दोषी आढळलो तर जेलमध्ये टाका असे थेट अव्हान देत खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रूनुकसानीचे दावे ठोकण्याचा इशारा दिला.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून देवस्थान जमीनी तसेच दर्ग्याच्या जमिनींचे घोटाळे गाजत आहेत. तसाच घोटाळा आष्टी तालुक्यातूनही समोर आलेला आहे. यात दोन गुन्हे दाखल आहेत. यात जणांची अटकही झालेली आहे. त्यातच आता या संपुर्ण घोटाळ्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाचीही नेमणूक झालेली आहे. या पथकाने आपले कामही सुरू केले आहे.
आष्टीतील राम खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपुर्वी आमदार सुरेश धस यांनी देवस्थान व दर्ग्याच्या जमिनी लाटल्या असून यात एक हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप पत्रकार परिषद घेत केलेला आहे. त्याचबरोबर धस यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व ईडीकडेही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. धस यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. धस सर्व प्रकरणावर गेल्या काही दिवसांपासून चुप्पी साधून होते.
अखेर धस यांनी शिरूर येथे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात या संपुर्ण प्रकरणावर भाष्य केले. यावेळी धस म्हणाले की, बँकेच्या अंदाजपत्रकानुसार माझे घर दोन कोटींचे आहे. पण ते 60 कोटींचे असल्याचा कांगावा केला जात आहे. सरकारच्या माध्यमांतून मला अडचणीत आणले जात आहे असा आरोप करत धस पुढे म्हणाले की, माझ्या कुटूंबातील कोणीही गुत्तेदार नाही, आम्ही केवळ जनतेची सेवा करतो असेही धस म्हणाले.
ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध एक कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने आष्टी – पाटोदा – शिरूर या विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. धस यांना याच मुद्द्यांवरून घेण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. हा संघर्ष अधिक पेटणार असेच दिसत आहे.