जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर आगाराच्या बसला मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवर अपघात झाला. या अपघातात पुल तोडून एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये 13 जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर 25 जण बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. ही बस इंदुरहून अंमळनेर कडे जात होती. त्यावेळी ही घटना घडली.
नर्मदा नदीत एस टी महामंडळाची बस कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे.या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी प्रवास करत होते. यात 13 लहान मुलांचा समावेश होता. मध्यप्रदेशातील खलघाट आणि ठिगरी येथे असणाऱ्या नर्मदा नदीवरील पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली.
धार जिल्हा प्रशासनाकडूून घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले होते. प्रशासनाने नर्मदा नदीत कोसळलेली बस क्रेनच्या सहाय्याने नदीबाहेर काढली,या अपघातात बसचा अक्षरशा: चेंदामेंदा झाला होता. बसचा सांगाडा नदीतून बाहेर काढल्यानंतर थरकाप उडवणारे दृश्य दिसत होते.
एसटी तर्फे प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा
मध्य प्रदेशातील नर्मदा बस दुर्घटनेत बुडून मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटी तर्फे प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा नदीच्या पुलावर झालेल्या अपघाताच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याशिवाय, या अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश सरकारची मदतीची घोषणा
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनीदेखील अपघाताच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दूरध्वनीवरून बोलणं झालं असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांना घटनास्थळी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आज झालेल्या अपघातातील शोकाकुल कुटुंबीयांसोबत मी आणि मध्यप्रदेश उभे आहोत असे त्यांनी म्हटले. मध्य प्रदेश सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केली.