Sushma Andhare । मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडमध्ये सुषमा अंधारेंची नवी घोषणा, अरे गद्दारांनी चिन्ह गोठवलयं, खुद्दारांचं रक्त पेटवलयं !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबरोबरच शिवसेना नाव वापरण्यास बंदी घातल्याने शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात शिवसेनेच्या वतीने महाप्रबोधन यात्रेस सुरुवात झाली आहे. 9 ऑक्टोबर रोजी ठाण्यातून महाप्रबोधन यात्रेला सुरुवात झाली.
शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 48 विधानसभा मतदारसंघातून ही महाप्रबोधन यात्रा जाणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील आक्रमक भाषणानंतर सुषमा अंधारे यांनी ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेच्या पहिल्याच कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली आहे. याच भाषणात अंधारे यांनी दिलेल्या घोषणेची महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.
प्रबोधनयात्रेत मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर कडाडून हल्ला चढवला, अंधारे म्हणाल्या की, काल त्यांनी आमचं नाव आणि चिन्ह जरी गोठवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते आमचं स्पिरीट अजिबात गोठवू शकलेले नाहीत. ते आमच्या लढण्याची जिद्दी गोठवू शकले नाहीत, त्याची साक्ष देणारी ठाण्यातल्या आजच्या सभेतील ही गर्दी आणि हा उत्साह आहे.
सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की, तुम्ही काहीही केलं, कितीही कुटील राजनीती केली तरीही, फडणवीस साहेब, ही अलोट गर्दी याची साक्ष देणारी आहे की, येणारा पुढचा मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे हे असणार आहेत असे सांगत अंधारे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला.
“महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा का हाती घेण्यात आली आहे याविषयी अंधारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अरे गद्दारांनी चिन्ह गोठवलयं, खुद्दारांचं रक्त पेटवलयं अशी घोषणा अंधारे यांनी देताच उपस्थितांनी या घोषणेला जोरदार प्रतिसाद दिला.”
“चुकीचं धोरण राबवणाऱ्यांचे बुरखे फाडले पाहिजेत म्हणून प्रबोधन यात्रा आहे. कारण लोक शहाणे झाली पाहिजेत”, असं अंधारे म्हणाल्या. “नेता सच्चा असला पाहिजे तर त्याची पूर्वअट अशी आहे की जनता सुद्धा सच्ची असली पाहिजे. म्हणून सच्चा जनतेला सच्चा नेता मिळण्यासाठी आधी जनतेला सजग मतदार म्हणून प्रबोधन झालं पाहिजे,असे अंधारे यांनी स्पष्ट केले.”
मतदारांना कळलं पाहिजे की, आपण काय केलं पाहिजे. आपल्या उमेदवार निवडता आला पाहिजे. त्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा गाव-खेड्यातून जाणार आहे. ही महाप्रबोधन यात्रा पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि दुसऱ्या टप्प्यात विधानसभा लेव्हला असेल. गाव-खेड्यांमध्ये जाऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा माणूस म्हणून माणूस जोडण्याचं काम ही प्रबोधन यात्रा करेल”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आम्ही महाप्रबोधन यात्रा का करत आहोत? यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही ही महाप्रबोधन यात्रा करत आहोत.जे लोक निघून गेले त्या लोकांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही.तर त्या मतदारांचा आणि जनतेचाही विश्वासघात केला. कारण तुम्ही शिक्के जे मारले होते त्या विचारधारा बघून मारले होते आणि नेमके त्या विचारधारेशीच या लोकांनी गद्दारी केली असा हल्लाबोल अंधारे यांनी केला.
आम्ही कुठे विचारधारा सोडली? आम्ही बाळासाहेबांचेच विचारधारेचे आहोत.हे लोक बाळासाहेबांचे वारसधार कसे असतील? जे लोक हिंदुत्वाच्या नावाखाली इतर धर्मीयांचा द्वेष करतात त्यांना कळत नाही की धर्मवीर आनंद दिघे यांचे सर्वात विश्वासू साथीदार, सहकारी, मित्र, गुरुवर्य ते साबिरभाई शेख सारखे नेते होते. त्या साबिरभाई शेख यांना तुम्ही कसे विसरु शकता? असा रोकडा सवाल अंधारे यांनी शिंदे गटाला केला.
जे लोक म्हणतात की, आम्ही बाळासाहेबांचे वारसदार, बाळासाहेबांचा वारसदार असणारा माणूस आपल्याच शिवसैनिक भावाच्या विधवा पत्नीच्या विरोधात कसा उमेदवार उभा करु शकतो?तोही दुसऱ्यांचा. एकीकडे शिवसेना वाचवायचं म्हणतात, आणि शिवसेनेचा उमेदवारच देत नाहीयत. पण तरीही यांना घाई फार असते”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या
सुषमा अंधारे यांच्या भाषणावर शिवसैनिकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. सुषमा अंधेरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत टीका केली. त्यांच्या मन की बात कार्यक्रमाचा उल्लेख करत निशाणा साधला. “जन की बात कब सुनोगे? असा प्रश्न करत थेट हल्ला चढवला. या सभेत सुषमा अंधारे यांनी भाषणाच्या शेवटी दिलेली नवी घोषणा महाराष्ट्रात चर्चेत आली आहे. या वेळी खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, आमदार भास्कर जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे सह शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.