जामखेड टाईम्स वृत्तसेवा । MahaDBT Student Scholarship : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
महाडीबीटी पोर्टलद्वारे (MahaDBT Portal ) लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी दिली.
तसेच 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरुन या सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नुतनीकरण करण्यास 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
काही अभ्यासक्रमासाठी सीईटीचे राऊंड अजूनही सुरु आहेत, त्यामुळे 12 जानेवारीपर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करु शकले आहेत. याचा विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नुतनीकरण करण्यास ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.