जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्य सरकारने हाती घेतलेल्या आनंदाचा शिधा उपक्रमावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलांनी जामखेड दौर्यात चांगलाच समाचार घेतला. आनंदाचा शिधा उपक्रमावर टीका करण्यापेक्षा विरोधकांनो तुमचा शिधा वेळेवर लोकांना द्यायचा होता ना, असे म्हणत विरोधकांना विखे-पाटीलांनी जोरदार टोला लगावला.
राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज 24 रोजी जामखेड दौर्यावर होते. या दौर्यात खर्डा येथे आयोजित आढावा बैठकीत विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्या हस्ते आनंदाचा शिधा किटचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री विखे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी, तहसीलदार योगेश चंद्रे सह आदी अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे-पाटील म्हणाले की, मागचे दोन अडीच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य द्यायचा उपक्रम हाती घेतला. जवळ जवळ 80 टक्यांपेक्षा अधिक लोकांना मोफत धान्य मिळालं, आणि त्याचाच परिणाम म्हणून जेव्हा आपलं सरकार राज्यात सत्तेत आलं, तेव्हा आपण दिवाळी निमित्त आनंदाचा शिधा राज्यातील जनतेला द्यावा ही कल्पना पुढे आली.
आनंदाचा शिधा उपक्रमावर टीका झाली, लवकर आला नाही. परंतू मी टीका करणारांना अवाहन केलेलं आहे. ठिकयं आमचा वेळेवर आला नाही पण तुमचा तरी वेळेवर द्यायला काय हरकत होती ? टीका करण्यापेक्षा तुमचा शिधा वेळेवर लोकांना द्यायचा ना , त्यात काय अडचण नाही ना, टीका तर होत राहिल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर लोकांना काळी दिवाळी साजरी करावी लागली असे म्हणत विखे-पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
आनंदाचा शिधा अजून काही लोकांना मिळायचा राहिला असेल तर पुढच्या पाच सहा दिवसांत त्याचे वाटप होईल. सगळ्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. यंदा पहिलं वर्ष आहे, याच्यातून ज्या त्रुटी समोर आल्या आहेत त्या पुढच्या वर्षी दुर करू. आणि वेळेवर आनंदाचा शिधा पोहच करू असे यावेळी विखे-पाटील म्हणाले.