जामखेड । बाॅम्ब ठेवल्याच्या फोनने राज्याच्या पोलिस यंत्रणांची उडवली झोप, जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अहमदनगर जिल्ह्यात दहशतवादी कारवाया होऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात कलम 144 लागू केले होते. सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क होऊन काम करत असतानाच, रविवारी एका फोनने जिल्ह्यासह राज्याच्या पोलिस यंत्रणांची झोप उडवली.मुंबईपासून जामखेडपर्यंतच्या पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या, सर्व यंत्रणा वेगाने कामाला लागल्या. काही तासांच्या कसुन तपासानंतर ‘तो’ फोन ‘अफवा’ पसरवणारा होता, हे निष्पन्न झाले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वा:स टाकला.
अहमदनगर जिल्ह्यातील नान्नज या जामखेड तालुक्यातील गावात सहा ठिकाणी बाॅम्ब ठेवण्यात आले आहेत असा फोन पोलिस दलाच्या मुंबई येथील मुख्य नियंत्रण कक्षाला रविवारी सकाळी गेला. यानंतर संपुर्ण राज्याची पोलिस यंत्रणा सतर्क झाली. अहमदनगर पोलिस दलाच्या बाॅम्बशोधक पथकाने श्वानपथकासह तातडीने नान्नजकडे धाव घेतली. त्या आधी जामखेड पोलिस दलाचे एक पथक नान्नजला दाखल झाले होते. या पथकाने नान्नज गावात कसून शोध सुरु केला होता.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील मध्यवस्तीत असणाऱ्या बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवल्याची खबर दिनेश सुतार या व्यक्तीने मुंबई कंट्रोलला दिली होती. वरिष्ठ विभागाकडून तातडीने जामखेड पोलिसांना याबाबत कळविण्यात आले होते. पोलिसांचा फौजफाटा नान्नजमध्ये दाखल झाल्याने गावात काहीतरी अघटीत घडल्याचे दिसत होते, परंतू नेमकं काय घडलं ? याबाबत कोणालाच कल्पना नसल्याने काय घडलं असावं ? याचा नागरिक कानोसा घेताना दिसत होते. नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
बॉम्ब ठेवल्याची खबर मुंबई कंट्रोलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रविवारी (दि. १८) सकाळी दहा वाजता पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी भोस, पोलिस कॉन्स्टेबल आबा आवारे, सतीश दळवी, नवनाथ शेकडे यांना संबंधीत ठिकाणी रवाना केले. जामखेड पोलिसांचा फौजफाटा नान्नज गावातील बालाजी मेडिकलजवळ सकाळी दहा वाजता दाखल झाला. पोलिसांनी वेगाने बाॅम्ब शोध मोहिम जारी केली.
सुरूवातीला पोलिस नेमकी कश्याची तपासणी करतायेत याचा स्थानिकांना कानोसा लागला नाही, पण पोलिस जास्त वेळ गावात तपास करू लागल्यानंतर गावातील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. जामखेड पोलिसांनी दिवसभर बालाजी मेडिकलसह परिसराची तपासणी करत अनेकांची चौकशी केली.
दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास अहमदनगर येथील बॉम्बशोधक पथक नान्नजला दाखल झाले. बॉम्बशोधक व बाॅम्ब निकामी करणाऱ्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मुरकुळे, हवालदार एस.सी.येटेकर, पोलिस नाईक सतीश तवार, उमेश मोरे, दिनेश पळलकर, अंकुश कुलांगे, कॉन्स्टेबल गौरव भिंगारदिवे, देविदास शेंडे, रोहित कांबळे, अरुण गायकवाड, गडदे आदी नान्नजमध्ये दाखल झाले.
यावेळी मेडिकल परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. मेडिकलसह संपूर्ण परिसराची या पथकाने तपासणी केली. डॉग स्क्वॉडमधील जंजीर या श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, पथकाला बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान ज्या मोबाईल क्रमांकावरून मुंबई नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्याचा फोन गेला होता, तो फोन दिनेश सुतार या व्यक्तीने केला होता, दिनेश सुतारचा दिवसभर शोध लागला नाही, सुतार यांच्याविरोधात रविवार रात्री उशिरा जामखेड पोलिस ठाण्यात कलम 177, 182, 505 (1)(B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार शिवाजी भोस यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.