प्रांताधिकारी शिवीगाळ प्रकरण तापले, महसुल कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा : अहमदनगर जिल्ह्यात उमटू लागले पडसाद
सत्तार शेख। जामखेड टाईम्स वृत्तसेवा। कर्जत तालुक्यात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याने शिवीगाळ करण्याचे प्रकरण आता भलतेच तापले आहे. याचे पडसाद अहमदनगर जिल्ह्यात उमटू लागले आहेत. त्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात महसुल विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्जत – जामखेड मतदारसंघात आणले. मतदारसंघात आलेले नवे अधिकारी मोठ्या जोमाने मतदारसंघात काम करत आहेत. आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणार्या काही कर्मचाऱ्यांना नव्या सिस्टीमचा भाग बनवण्यात अपयश येत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. ही चिंतेची बाब आहे.
शुक्रवारी कर्जत उपविभागाचे प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांना एका पोलिस कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ करण्याचे प्रकरण उजेडात आले. संबंधित पोलिस कर्मचारी खाकी वर्दीच्या आडून वाळू तस्करीचा गोरखधंदा करत असल्याचे समोर आले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन केले ही समाधानाची बाब असली तरी संबंधित पोलिस कर्मचारी कुणाच्या आशिर्वादाने आजवर वाळू तस्करीचा गोरधंदा करत होता ? त्याच्या या धंद्यात अजुन कुणा कुणाची भागीदारी आहे? याचा पर्दाफाश करण्याचे धाडस कर्जत पोलिसांना दाखवावे लागेल.
त्या पोलिस कर्मचाऱ्याला नेमका कुणाचा आशिर्वाद?
उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्याचे धाडस त्या पोलिस कर्मचाऱ्याने कुणाच्या आशिर्वादाने केले ? संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करताना प्रांताधिकाऱ्यांनी फिर्याद का दिली नाही ? सरकारी कामात अडथळा आणण्याचे प्रकरण असतानाही या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम 353 चा समावेश का झाला नाही ? यावर आता कर्जत तालुक्यात उलट सुलट चर्चा रंगताना दिसत आहे.
महसुल कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा
दरम्यान प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले शिवीगाळ प्रकरण आता तापू लागले आहे. महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. संबंधित प्रकरणातील दोषी पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याबरोबरच संबंधित गुन्ह्यात कलम 353 चा समावेश करावा अशी मागणी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपापल्या तहसील कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून काम बंद अंदोलन हाती घेण्याचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे आता हे प्रकरण भलतेच तापले आहे.महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने या प्रकरणात आता पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी नेमकं काय घडलं ?
शुक्रवार, दि १९ रोजी सकाळी ७:२७ च्या सुमारास कर्जत शहरातील बालाजीनगर या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारा एक टीपर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या निदर्शनास आला होता. थोरबोले यांनी सदर बाब तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या कानावर टाकली. आगळे यांनी तात्काळ तलाठी दीपक बिरुटे, रवींद्र लोखंडे, धुळाजी केसकर आणि मंडळ अधिकारी बाळासाहेब सुद्रीक यांच्या पथकाला नियोजित ठिकाणी रवाना केले होते. महसुल पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी एमएच १२ आरएन ४७०४ हा टीपर आढळून आला होता.
सदर टीपरची महसुल पथकाने पाहणी केली असता त्यात जवळपास तीन ब्रास वाळू असल्याचे आढळून आले होते. महसुल पथकाने सदर टीपर थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी एका चारचाकी गाडीजवळ निळा पांढऱ्या रंगाचा टीशर्ट परिधान केलेल्ता इकेशव व्हरकटे याने आपण स्वता: पोलीस असून टीपर खाली करून देण्यास सहकार्य करावे असे सांगितले. मात्र प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांनी सदर टीपर प्रांत कार्यालयात जमा करावे असे आदेश सोडले. यावेळी थोरबोले यांनी यासर्व घटनेचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये सुरू केले होते. पोलीस कर्मचारी असणारा केशव व्हरकटे याने त्यास अडथळा आणत चक्क प्रांताधिकारी थोरबोले यांना दमबाजी, शिवीगाळ केली. आणि सदरच्या टीपरमधील वाळू खाली करीत टीपर घेऊन पळून गेला.
त्या पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
टीपर चालक अज्ञात इसम आणि निळा पांढरा टीशर्ट नामक पोलीस कर्मचारी सांगणारा केशव व्हरकटे याच्यावर तलाठी दीपक बिरुटे यांच्या फिर्यादीनुसार भादवी कलम ३७९, १८६, ५०४, ३४ भारतीय पर्यावरण कायदा ३, १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे पुढील घटनेचा अधिक तपास करीत आहे.
त्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांना शिवीगाळ करणाऱ्या केशव व्हरकटे या वाळूतस्कर पोलिस कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी रात्री उशिरा निलंबनाची कारवाई केली. मात्र महसूल कर्मचारी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करावे या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.