Rohit Pawar | चला पेटून उठा.. शांत बसू नका.. आपली ताकद दाखवा.. आमदार रोहित पवारांची कार्यकर्त्यांना साद !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। रोहित पवार विरूद्ध राम शिंदे या दोन्ही आमदारांमधला राजकीय संघर्ष तीव्र बनत चालला आहे.पवार विरूद्ध शिंदे या संघर्षामुळे दोन्ही पक्षातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्येही वातावरण टाईट बनले आहे.आक्रमक होत ऐकमेकांविरोधात कार्यकर्ते आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडवून देत असल्याचे दिसत आहेत.असे असतानाच आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी जामखेडमध्ये केलेले वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.
आमदार रोहित पवार यांच्याकडून मंगळवारी जामखेडमध्ये दिवाळी निमित्त शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या धुराळ्यावर आमदार रोहित पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या कार्यक्रमातून पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भाजप विरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिले.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले की, नान्नजच्या पुलावरील फलक कोणीतरी गायब केला. असं मला कोणीतरी सांगितलं पण अशीच परिस्थिती कर्जत तालुक्यातील बर्याच गावांमध्ये झाली होती.पण तिथे असणारे आपल्या विचारांचे कार्यकर्ते ते काही शांत बसले नाहीत.जो कोणी त्याठिकाणी बोर्ड पाडायचा,आपला कार्यकर्ता जाऊन त्या ठिकाणी बोर्ड उभा करायचा.एक कार्यकर्ता नाही तर असे अनेक कार्यकर्ते.त्यामुळे आपल्याला जे काही समजुन घ्यायचं ते समजून घ्या, आपापल्या गावांमध्ये तुम्हाला सुध्दा त्याठिकाणी लढावं लागेल, असा सूचक संदेश पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
“रोहित पवार पुढे म्हणाले की, लढा देत असताना आम्ही वरच्या पातळीवर लढा देतचं आहोत, तालुका पातळीवरही लढा देत आहोत आणि त्याच्याचबरोबर गावपातळीवर असो किंवा शहराच्या पातळीवर लढा द्यायचा असेल, तर पदाधिकारी असतील आणि कार्यकर्ते असतील त्यासाठी तुम्ही सक्षम आहात. तुमच्यावर माझा विश्वास आहे.पार्टीचा विश्वास आहे.आमच्या सर्वांचा विश्वास आहे. तुम्हीच खरी ताकद आहात. पण ती ताकद सुध्दा आता आपल्याला कुठंतरी त्या ठिकाणी दाखवावी लागेल, अशी साद घालत कार्यकर्त्यांनी संघर्षांसाठी सज्ज रहावे, असे अवाहन पवार यांनी केले.”
कामं होत असताना कामं झाली, अनेक कामं होत आहेत. पण तरीसुद्धा एखादा भाजपचा कार्यकर्ता त्रास द्यायचा म्हणून तो त्रास देत असेल आणि आपण शांत बसत असू तर हे योग्य नाही असं माझ्यासारख्याला त्याठिकाणी वाटतं, असे सांगत नाहक त्रास देऊ पाहणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना थेट अंगावर घ्या, असे आदेशच आमदार रोहित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.
“जर एखाद्या गावामध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही आहोतच पण तुम्ही सुध्दा कुटुंब म्हणून त्या कार्यकर्त्यासोबत त्या ठिकाणी राहण्याची जरूरत आहे. याच्याच बरोबर आपल्या पार्टीला सुध्दा ताकद देण्याची जरूरत आहे असं मला वाटतं असे म्हणत एक व्यक्ती सगळीकडे लढू शकतं नाही, त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारीही महत्वाचे असतात असे सांगत संघर्षांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असेच अवाहन पवार यांनी केले.”
दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी अगामी काळात भाजप विरूद्ध संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी गावपातळीवरही सज्ज असल्याचाच इशारा भाजपला दिला आहे. यामुळे भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया उमटते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.