कर्जतमधील “तो” पोलीस कर्मचारी निलंबित तर आक्रमक महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनाच्या तयारीत
प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले शिवीगाळ प्रकरण तापू लागले
कर्जत | अफरोज पठाण | कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना काल शिवीगाळ करून अडथळा निर्माण करणारा पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाळू तस्कर पोलीस असणारा कर्मचारी केशव व्हरकटे याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्रीच निलंबनाचे आदेश कर्जत पोलीस उपअधीक्षक कार्यलयास पारित केले आहे.
शुक्रवार, दि १९ रोजी कर्जतचे प्रांताधिकारी यांनी आपल्या पथकासह अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर पकडला असता त्या वाहनालगत उभा असणारा पोलीस उपअधीक्षक कार्यलयात कार्यरत असणारा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने शिवीगाळ करून थोरबोले यांना अडथळा आणून तो टीपर पळवून नेला होता.
याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात व्हरकटे आणि अज्ञात चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निलंबन करण्यात आले. एका सरकारी कर्मचाऱ्याने आपले वरिष्ठ अधिकारी असणारे यांनाच शिवीगाळ करून अडथळा निर्माण केल्याच्या घटनेने दोन्ही विभागात मोठी खळबळ उडाली. पोलीस विभाग जनतेचे रक्षक असताना त्यांच्या एका कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकार्यास अशी शिवीगाळ करून मज्जाव करने अशोभनीय आहे.
महसुल कर्मचाऱ्याचा आक्रमक पवित्रा – काम बंद आंदोलन करण्याचा इशारा
प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा करणारा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यास तात्काळ बडतर्फ करावे. यासह गुन्हा दाखल करण्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदार स्वता उपस्थित असताना झालेला विलंब याचा महसुल अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच सदर फिर्यादीमध्ये ३५३ कलम लावण्याची मागणी कर्जत महसुल प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. सदर मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले.