Voting for Karjat Nagar Panchayat elections । कर्जत नगरपंचायतीवर कब्जा कुणाचा ? उद्या मतदान, राम शिंदे आणि रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा। सत्तार शेख | राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. (Voting for Karjat Nagar Panchayat elections is going on tomorrow) या निवडणुकीत रोहित पवार विरूध्द राम शिंदे हा सामना रंगला आहे. पवार आणि शिंदे या दोघा नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. (Rohit Pawar vs Ram Shinde) कर्जत नगरपंचायतवर कुणाचा कब्जा होणार? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
मागील पाच वर्षे कर्जत नगरपंचायतवर भाजपची सत्ता (BJP’s power) होती. राष्ट्रवादीला मागील निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता. परंतू विधानसभा निवडणुकीनंतर कर्जत- जामखेड मतदारसंघाचे राजकीय चित्र बदलले. भाजपचा 25 वर्षांचा अभेद्य गड उध्वस्त झाला. राष्ट्रवादीने मतदारसंघात पहिल्यांदा शिरकाव केला. सध्या राष्ट्रवादीने सर्व निवडणुकीत आपले बस्तान बसवण्याची मोहिम मतदारसंघात हाती घेतली आहे.
दोन वर्षांपुर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभव झाला. सध्या आमदार राष्ट्रवादीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे बहूतांश पदाधिकारी भाजपचे असे चित्र आहे. दोन वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. अनेकांची पक्षांतरे झाली. त्यातून राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्था काबिज करण्याची मोहिम हाती घेतल्याचे संकेत मिळाले. अर्थात भाजप विरूध्द राष्ट्रवादी हा टोकाचा संघर्ष सुरू झाला.
भाजप विरूध्द राष्ट्रवादी या संघर्षाचा भडका सध्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत उडाल्याचे उभा महाराष्ट्र पाहत आणि अनुभवत आहे. भाजपच्या उमेदवारांवर दबाव टाकून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडणे असो की ऐन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या उमेदवाराला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास भाग पाडणे असो असे प्रकार घडल्याने कर्जतची निवडणुक राज्यात गाजत आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आक्रमक खेळीला भाजपने मौनव्रत अंदोलन करत उत्तर दिले. प्रचाराची सांगता सभा जोरदार घेतली. प्रचारात दोन्ही गटाकडून जोरदार फटकेबाजी सुरू होती. शहरात कुरघोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर झाले. या निवडणुकीत मुस्लिमांचे राजकीय अस्तित्व नाकारण्याचा मोठा डाव राष्ट्रवादीने खेळला. याचे पडसाद अगामी काळात राज्याच्या राजकारणात नक्कीच उमटतील असा कसाय आता राजकीय जाणकार लावत आहेत.
कर्जत नगरपंचायत निवडणुक 13 जागांसाठी होत आहे. यातील एका प्रभागात एकच उमेदवार आहे. त्यासंबंधी बिनविरोधची घोषणा होणे बाकी आहे. प्रभाग 14 मधील भाजपच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे तिथे बिनविरोध होईल असे सध्या चित्र असले तरी मतदानादिवशी या प्रभागात नोटाचा वापर केला जाणार अशी चर्चा आहे. त्यामुळे इथे नेमकं काय घडतं ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या धुराळ्यात शेवटचे दोन दिवस महत्वाचे असतात या दोन दिवसात दारू आणि पैश्यांचा महापुर येतो. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आज कत्तलची रात्र आहे. येथे घडणाऱ्या घडामोडींवर प्रशासनाला करडी नजर ठेवावी लागणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता सर्व राजकीय पक्षांना संयम दाखवावा लागेल. प्रशासनालाही मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
दरम्यान भाजपच्या ताब्यात असलेली कर्जत नगरपंचायत हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रवादी आसुसलेली आहे. तर भाजप नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा आमचीच सत्ता येणार असा दावा करत आहे. राम शिंदे यांनी मंत्रीपदाच्या माध्यमांतून कर्जत शहरासाठी करोडो रुपयांचा निधी दिला. अनेक महत्वाची कामे मार्गी लागली. या बळावर भाजपकडून मते मागितली जात आहेत. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार विकासाचे व्हिजन दाखवून जनतेला साद घालत आहेत. तसेच आयारामांच्या ताकदीवर नगरपंचायत सर करण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा पुर्ण होणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या संपुर्ण प्रक्रियेत कर्जतकरांनी वेगळ्याच पध्दतीचे राजकारण अनुभवले. आमदार रोहित पवार आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांच्या अगामी राजकारणाची दिशा या निवडणुकीतून स्पष्ट झाली आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत काय होणार ? जनता कुणाच्या पारड्यात कौल टाकणार याचा मतदानरूपी फैसला उद्या (21 डिसेंबर रोजी) होणार आहे. परंतू बेरजेच्या राजकारणात राम शिंदे बाजी मारणार की रोहित पवार ? याचीच उत्सुकता आता राज्याला लागली आहे.