जामखेड टाईम्स वृत्तसेवा। सत्तार शेख । कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून भाजप विरूध्द राष्ट्रवादी हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत हा संघर्ष अधिकच उफाळून आला. आमदार रोहित पवार यांना खिंडीत पकडण्याची मोहीम भाजपने हाती घेतली आहे. यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विकास कामांवरून सध्या भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई जुंपल्याचे दिसत आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या काळात मंजुर झालेली कामांचे श्रेय आमदार रोहित पवारांकडून घेतले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केला आहे.
कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील 7 तीर्थक्षेत्रासाठी 4 कोटीचा प्रलंबित निधी मंजूर झाला आहे. यामुळे तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. संबंधित निधी आपल्या पाठपुराव्यामुळेच मंजुर झाला आहे असा दावा आमदार रोहित पवारांकडून करण्यात आला. तश्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. परंतू पवारांच्या दाव्यावर भाजप शांत बसेल ती कसली. भाजपने पवारांच्या दाव्याची हवा काढून घेण्यासाठी दंड थोपटले आहेत.
कर्जत जामखेड मतदारसंघाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित टप्प्याचा विकास करण्यासाठी माजी तत्कालीन पर्यटनमंत्री प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या व त्यांनीच भूमिपूजन करून उद्घाटन केलेल्या श्री.सद्गुरू गोदड महाराज मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह मतदारसंघातील इतर तीर्थक्षेत्रांचा विकास आराखड्यात समावेश झाला होता. त्यानुसारच मतदारसंघातील 7 तीर्थक्षेत्रांसाठी 4 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे श्रेय हे माजी मंत्री राम शिंदे यांचेच आहे असा दावा भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केला आहे.
सचिन पोटरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विधानसभा निवडणूक होऊन अडीच वर्ष पूर्ण होत आली आहेत. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली विकास कामे अजूनही सुरू आहेत. काही विकास कामे षडयंत्र करून दाबून ठेवली जात आहेत. ती तातडीने सुरू व्हावीत. राम शिंदे यांच्या कामाचे कुणीही श्रेय घेऊ नये अशी जनतेची आणि भाजपची मागणी आहे असे म्हणत पोटरे यांनी रोहित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांची कामे गेल्या अडीच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत होती. अनेक ठेकेदारांची बिले अडकली होती. ठेकेदारांनी सातत्याने पाठपुरावा करून अपूर्ण कामे मंजूर करून आणली असल्याचे समजते कारण या कामात त्यांची बिले अडकली होती परंतु श्रेय वादाच्या लढाईत कर्जत जामखेड चे लोकप्रतिनिधी कुठेच कमी पडताना दिसत नाहीत हे आता जनतेच्या पूर्णपणे लक्षात आले आहे. पवारांच्या भुल भुलैय्याला जनता कंटाळली असल्याचा टोला पोटरे यांनी लगावला.
विद्यमान आमदारांनी उरलेल्या अडीच वर्षांत माजी मंत्री राम शिंदे यांनी मंजुर केलेली परंतू राजकीय कुरघोडीत सुरू न झालेली कामे सुरू करण्याचे धाडस दाखवावे असे अव्हान देत आपल्या राजकारणाच्या ” नव्या पर्वाची ‘ दहशत दादागिरी , व दडपशाहीची कर्जत जामखेडच्या जनतेने कर्जत नगरपंचयात निवडणुकीत झलक पाहिली असून यामुळे नोकरदार वर्ग व सर्वसामान्य जनता भयभीत झाली असून या नव्या पर्वाला जनता नक्कीच निकालाच्या धक्क्याने जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही असे म्हणत सचिन पोटरे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला.
कर्जत जामखेड मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी हा संघर्ष अधिकच उफाळून आला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी राष्ट्रवादी पर्यायाने आमदार रोहित पवारांवर केलेल्या जोरदार टीकेमुळे राष्ट्रवादी पुरती घायाळ झाली आहे. आता राष्ट्रवादीकडून पोटरेंनी केलेल्या टीकेला काय उत्तर येते याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.