जामखेड नगरपरिषदेसाठी सुजय विखे उतरले मैदानात : 135 कोटींचा चारपदरी रस्ता ठरणार निर्णायक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड नगरपरिषदेची कोणत्याही क्षणी निवडणुक लागु शकते. या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणुक तयारी हाती घेतली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यासाठी सुजय विखेंनी कंबर कसली आहे. याच दृष्टीने विखे यांनी जामखेड शहरासाठी नवी योजना हाती घेतली आहे.

खासदार सुजय विखे यांनी जामखेड शहराची वाहतूक कोडींतून सुटका करण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर घालणारा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यांनी मंगळवारी जामखेडच्या जिल्हा सहकारी बँकेच्या परिसरात नॅशनल हायवे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत नव्या चारपदरी रस्त्याचा आराखडा सादर करण्यात आला.

विखे यांच्या पुढाकारातून जामखेड शहरातून जाणारा जामखेड नगर परिषद हद्दीतील नगर – बीड रस्ता साकत फाट्यापर्यंत चारपदरी केला जाणार आहे. यासाठी सुमारे 135 कोटींचा निधी विखे यांनी मंजुर करून आणला आहे. राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत या रस्त्याचे काम होणार आहे. जामखेड शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. विखे यांनी जामखेड दौर्‍यात सदर प्रस्तावित रस्त्याची नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

नगरपरिषद निवडणुकीत हा प्रकल्प भाजपसाठी निर्णायक ठरू शकतो असे आता बोलले जात आहे. हा प्रकल्प लवकर सुरू झाल्यास भाजपला नगरपरिषद निवडणुकीत मोठा लाभ होऊ शकतो असा अंदाज आता वर्तवला जात आहे.

नगरपरिषद निवडणुकीत रंगणार विखे, शिंदे विरूध्द पवार सामना

अगामी जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा थेट सामना रंगणार आहे. ही निवडणूक गाजणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर होणारी ही निवडणूक भाजप व राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. मागील पाच वर्षांत नगरपरिषदेच्या सत्ताकारणात अनेक घडामोडी घडल्या.जनता अनेक नगरसेवकांना घरी बसवण्यासाठी आसुसलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व खासदार सुजय विखे व राम शिंदे करताना दिसतील. तर राष्ट्रवादीकडून आमदार रोहित पवार व स्थानिक नेते किल्ला लढवताना दिसतील.विखे, शिंदे विरूध्द पवार हा सामना नगरपरिषद निवडणुकीत रंगताना दिसेल हे मात्र निश्चित!