पक्षांतर करणाऱ्यांचा समाचार घेत खासदार सुजय विखे यांनी दिला ‘हा’ इशारा !
ज्यांचे संसार राम शिंदेंमुळे उभे राहिले ते आज फुटले परंतु भविष्यात सत्ता आल्यास..
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत जामखेड मतदारसंघातील बोटावर मोजण्या इतके नाही पण पुर्ण गाडीभरून असे कार्यकर्ते मी ओळखतो ज्यांच्या मागच्या पाच वर्षाचा प्रपंच, मुलीचं लग्न, मुलांच्या ॲडमीशनची फी, स्वता:च्या शेतीचा प्रपंच हे राम शिंदे यांनी उभं केलं. पण ते लोक आज समोरच्या गाडीत बसलेले आहेत. एव्हढं करून जर तो तुमचा होऊ शकला नाही तर तो कुणाचाच होऊ शकतं नाही असा टोला लगावत पक्षांतर करणाऱ्यांचा खासदार सुजय विखे यांनी जोरदार समाचार घेतला.
खासदार सुजय विखे पाटील आज जामखेड तालुका दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षांतर करणारांचा समाचार घेतला. कर्जत तालुक्यात मध्यंतरी झालेल्या पक्षांतरावर सुजय विखे यांनी आज जोरदार हल्लाबोल करत पक्ष सोडून गेलेल्यांना गर्भित इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना विखे म्हणाले की, राम शिंदे यांच्या सत्तेच्या माध्यमांतून अनेक विकास कामे झाली. पण निवडणुक जस जशी जवळ आली किंबहूना निवडणुकीनंतर चित्र बदललं आणि आमदार बदलला पण ज्यांची कुटूंबाची उपजीविका राम शिंदे यांच्यामुळे उभी राहिले ते लोक आज आपल्याबरोबर राहिले नाहीत.सत्ता कुठं आहे तिथे आपण गेलं पाहीजे अशी मानसिकता अहमदनगर जिल्ह्याची झाली आहे.
राम शिंदे यांना उद्देशून बोलताना विखे म्हणाले, आपल्यावर आज जरी वाईट प्रसंग आला असेल,जनतेने जो निर्णय दिला तो मान्य केला असेल, पण आपल्याला एका गोष्टीचा आनंद आहे तो म्हणजे फुटीरवादी लोकांचा खरा चेहरा समजला. जे लोकं आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, जे लोकं सत्तेकडे चालले आहेत त्यांना आपली सत्ता आल्यानंतर दारावर उभा करायचं नाही. ही खबरदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे.
सुजय विखे आल्याने ना पक्ष वाढला ना एखादा नगराध्यक्ष गेल्या त्यामुळे पक्ष संपलाय असं कधी होत नसतं, कारण भाजपची रचना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बळावर आहे. गावागावात असलेलं मजबुत संघटन हीच पक्षाची मोठी ताकद आहे असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये विखे यांनी जोश भरला.
यावेळी राम शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.