जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख । कर्जत – जामखेड मतदारसंघात पक्षांतराचे थंडावलेले वारे पुन्हा वाहू लागले आहे. येत्या 30 नोव्हेंबर 2021 रोजी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पक्षांतराचा बार उडवला जाणार आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजपाचे युवा नेते प्रशांत शिंदे यांचे भाजपकडून तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते. प्रशांत शिंदे हे राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या जवळा या गावचे सरपंच आहेत. शिंदे यांना भाजपने पक्षातून काढून टाकल्यानंतर ते राष्ट्रवादीत जाणार अशीच चर्चा सुरू होती. ती चर्चा आता खरी ठरणार आहे.
दरम्यान युवा नेते प्रशांत शिंदे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश अनेक कारणांनी लांबला होता. परंतू येत्या 30 नोव्हेंबर रोजीच्या मुहूर्तावर प्रशांत शिंदे हे राष्ट्रवादीत अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जवळ्यात शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यात प्रशांत शिंदेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल वाजलेला असतानाच पक्षीय पातळीवर आपला गड मजबूत करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊन पक्षाची ताकद वाढवली जात असल्याचे बोलले जात आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांचा होम ग्राऊंड म्हणून जवळा जिल्हा परिषद गट ओळखला जातो. या गटातील जवळा या गावाने सातत्याने राम शिंदे यांना बळ दिलेले आहे. आता अगामी निवडणूकीत राम शिंदे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीच्या या मोहिमेला प्रशांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मोठे बळ मिळणार आहे.