रोहित पवारांचा भाजपच्या राम शिंदेंना पुन्हा एकदा दे धक्का !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | कर्जत नगरपंचायत निवडणुकीतून सायंकाळी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राम शिंदेंचा मोठा धक्का दिला आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राम शिंदे विरूध्द रोहित पवार हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. रोहित पवारांकडून  माजी मंत्री राम शिंदेंना धक्क्यावर धक्के दिले जाऊ लागले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या उमेदवारांवर दबाव टाकून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याचे आरोप राम शिंदे यांनी केला होता. यानंतर गोदड महाराज मंदिरासमोर मौनव्रत ठिय्या अंदोलन शिंदेनी केले होते. त्यानंतर पुन्हा अनेक घडामोडी घडल्या. ज्यांनी उमेदवारी मागे घेतली त्यातील एका सदस्याच्या कुटूंबातील एकाचा व्हिडिओ काल सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाला होता.

तत्पूर्वी आज महाविकास आघाडीची कर्जतमध्ये जाहिर सभा होत असतानाच दिवसभरात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. यामध्ये सभा सुरू होताच सर्वांनाच धक्का देणारी राजकीय घडामोड समोर आली.

भाजपच्या प्रभाग क्रमांक १४ च्या उमेदवार शिबा सय्यद ह्या राष्ट्रवादीच्या मंचावर दिसल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार ताराबाई कुलथे यांना पाठींबा देत  मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेसचे हार्दिक पटेल आणि आ रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

राम शिंदे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. भाजपला रोहित पवारांनी ज्या पध्दतीने धक्क्यावर धक्के देण्याचा सिलसिला सुरू केला आहे ते पाहता भाजपला यातून सावरण्यासाठी मोठ्या ताकदीने हा सामना लढावा लागणार आहे हेच संकेत यातून मिळत आहेत.