जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । 4 जानेवारी 2024 : 2024 ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि कर्जत-जामखेडसाठी तुमची आणि माझी सर्वांची स्वाभिमानाची आणि अभिमानाची लढत आहे. त्यामुळे आपण सज्ज झालं पाहिजे. आपले दिवस लांब नाहीत, कोणी घाबरायचं काही कारण नाही, त्याच्यासाठी एकट्या पठ्ठ्या खंबीर आहे. पाषाणाला धडक मारायची हिम्मत गोपीनाथ मुंडेंच्या या चेल्यामध्ये आहे, फक्त तुमची साथ हवीय, अशी भावनिक साद आमदार प्रा राम शिंदे यांनी जनतेला घातली आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा भाजप व सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांच्या वतीने गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे खर्डा शहरातील बाजार समितीच्या आवारात आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांच्या साक्षीने आमदार प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करत नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे बोलत होत.
यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात आपल्या भागाचा मानसन्मान आणि स्वाभिमान सर्वोच्च करण्याचा जे काम मी केलं आणि जनतेच्या जनभावनेचा आशिर्वाद आणि सहकार्यामुळे पुन्हा एकदा आमदार होऊन तुमच्यात आलो. मी नुसता आमदार होऊन आलो नाही तर सरकार घेऊन आलो. महायुती सरकारच्या माध्यमांतून मतदारसंघाच्या विकासासाठी करोडो रूपयांचा निधी आणला आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन अडीच वर्षे कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली, खुनशीपणा, लोकांना आडवायचं, नडवायचं, अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला, जनतेला, शेतकऱ्यांना त्याची मुक्ती दिली त्याचं नावयं राम शिंदे आहे, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या दडपशाहीच्या राजकारणाचा जोरदार समाचार घेतला.
शिंदे पुढे म्हणाले, मतदारसंघातील नागरिकांचे फोन उचलतोच उचलतो पण बाहेरचाही लोकांचे फोन उचलतो ही राम शिंदेची ओळख आहे. सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपण अहोरात्र कार्यरत आहोत. 2024 ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि कर्जत-जामखेडसाठी तुमची आणि माझी सर्वांची स्वाभिमानाची आणि अभिमानाची लढत आहे. त्यामुळे आपण सज्ज झालं पाहिजे. आपले दिवस लांब नाहीत, कोणी घाबरायचं काही कारण नाही, त्याच्यासाठी एकट्या पठ्ठ्या खंबीर आहे. पाषाणाला धडक मारायची हिम्मत गोपीनाथ मुंडेंच्या या चेल्यामध्ये आहे फक्त तुमची साथ हवीय, अशी साद यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला घातली.
खर्डा येथे गौतमी पाटील यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कुठलाही गोंधळ न होता हा कार्यक्रम पार पडला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने उपस्थितांची मने जिंकली. तिच्या अदाकारीने उपस्थित प्रेक्षक घायाळ झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमास तरूणांनी प्रचंड गर्दी केली होती. टाळ्या आणि शिट्या वाजवत बेभान झालेल्या तरूणाईने गौतमी पाटीलने सादर केलेल्या प्रत्येक कलाकृतीला प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर व त्यांच्या टीमने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.