जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयातील कृषिदूत गेल्या काही दिवसांपासून मोहा येथे वास्तव्यास आहेत. या कृषिदूतांनी रब्बी ज्वारीला जैविक बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कृषीदूतांकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
रब्बी पिकांची पेरणी करताना पूर्वी शेतकरी गोमूत्र या पारंपरिक पद्धतीचा वापर करत होता. तरी, शेतकऱ्यांनी जैविक बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. त्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो आणि उगवण क्षमताही वाढते, असे मार्गदर्शन यावेळी कृषिदूतांनी केले. बीजप्रक्रिया करताना ज्वारीसाठी जिवाणू खत २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यासाठी वापरावे, असे प्रात्यक्षिक अश्रफअली शेख, चंद्रशेखर वाले, किरण दाताळ, सौरभ बोरकर, ओंकार दौंड, विकास जाधव, संविधान वानखेडे यांनी करून दाखवले.
सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करायच्या दृष्टीने मुल्यवर्धीत उत्पादने तयार करने अभिप्रेत आहे. रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश केल्याने आपले शरीर सृदृढ राहण्यात मदत होते. त्यामुळे तृणधान्यांमधील पोषणतत्वांचे आहारात अनन्यसाधारण महत्व आहे, यामुळे रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करा व निरोगी राहा, असा सल्लाही यावेळी कृषीदूतांनी दिला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. के. ससाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. ए. अनारसे, केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय सोनवणे, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. नजीर तांबोळी, कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश लांडे व विषय विशेषतज्ञ वनस्पती रोग शास्त्र डॉ. मनोज गुड आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.