जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राजुरी गावचा सर्वांगीण विकास करणे हे जनसेवा ग्रामविकास पॅनलचे ध्येय आहे, गावाचा विकास करण्याबरोबरच गावात शांतता नांदावी, गाव एकजूट रहावे, हा आमचा कायम प्रयत्न राहिला आहे. तो यापुढेही टिकून रहावा, हाच आमचा प्रयत्न असणार आहे, अगामी काळात राजुरीला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राजुरीतील सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली जाईल.विरोधकांच्या भूलभूलैयाला बळी न पडता जनतेने जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे अवाहन जनसेवा ग्रामविकास पॅनलचे पॅनल प्रमुख माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांनी केले.
राजुरीत जनसेवा ग्रामविकास पॅनलने रविवारी प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी पॅनलच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीने गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. रॅलीला नागरिकांची तुफान गर्दी लोटली होती. रॅलीमध्ये राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी, घुलेवस्ती, बांगरमळा येथील महिला, वृध्द, तरूण, तरूणी, नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रॅलीची सांगता श्रीराम मंदिर परिसरात झाली. यावेळी पॅनल प्रमुख सुभाष तात्या काळदाते यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले. तसेच त्यांनी जनसेवा ग्रामविकास पॅनल निवडणुक का लढवत आहे याविषयी भूमिका मांडली.
यावेळी बोलताना सुभाष तात्या काळदाते म्हणाले की, राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी माझी पत्नी वैशालीताई सुभाष काळदाते ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मी सरपंच असताना, ग्रामपंचायतची इमारत, गावात प्राथमिक शाळेची इमारत, दवाखाना, नदीवर सात बंधारे, रस्त्यांची कामं, दोन बंधाऱ्याची दुरूस्ती, डोळेवाडीची पाईपलाईन,ही महत्वाची कामे मार्गी लावलेली आहेत. आता अगामी काळात गावातील विजेची समस्या दुर करण्याबरोबर गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जाणार आहे. यासाठी आमचे नेते आमदार राम शिंदे साहेबांचा मदत घेतली जाईल असे काळदाते म्हणाले.
राजुरीला आदर्श गाव बनवण्यासाठी गावातील तरूण पिढीला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास साधला जाणार आहे. राजुरीची राज्यात नवी ओळख प्रस्थापित होईल,असे काम पुढील पाच वर्षांत करून दाखवले जाईल, असा शब्द यावेळी माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांनी दिला.
यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार वैशालीताई सुभाष काळदाते म्हणाल्या की, जनतेच्या आग्रहाखातर मी यंदाच्या निवडणुकीला सामोरी जात आहे, जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला जाणार नाही, जनतेने प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी दाखवलेले उत्स्फूर्त असे उदंड प्रेम सर्वकाही सांगुन जात आहे.जनता जनार्दनाच्या आशिर्वादाच्या बळावर यंदा जनसेवा ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आश्रू काळदाते मेजर, सुधीर भाऊ सदाफुले, संभाजी कोल्हे, राजू मोरे सह आदींनी आपली भूमिका मांडत जनसेवा ग्रामविकास पॅनलला जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.