जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । दशरथ हजारे गुरूजी यांनी 36 वर्षे शिक्षक म्हणून बजावलेली सेवा प्रेरणादायी आहे. कामात नीटनेटकेपणा, वेळेवर आणि कितीही साईट बिझनेस निर्माण केले तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासवरती आणि वेळेवरती कुठलाही परिणाम हजारे गुरूजी यांनी होऊ दिला नाही, त्यामुळे कोणाचं जास्त कमी ऐकुन घ्यायलाच नको, ते आपल्या स्वभावात नाही, म्हणून रिटायरमेंट होण्याच्या एक वर्षे आधीच हजारे गुरूजींनी आपली रिटायरमेंट स्विकारली. अलिकडच्या कालखंडामध्ये शिक्षक कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे दशरथ हजारे गुरूजी हे आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी काढले.
जामखेड तालुक्यातील जवळा येथील रहिवासी दशरथ हजारे गुरूजी यांनी एक वर्ष आधीच सेवानिवृत्त स्विकारली. ते मुंजेवाडी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. मुंजेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दशरथ हजारे गुरूजी यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राम शिंदे हे बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, बीडचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, तालुका गटशिक्षण अधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी सुरेश कुंभार, केंद्रप्रमुख राजेंद्र त्रिंबके, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, ज्योती क्रांतीचे चेअरमन आजिनाथ हजारे, पांडुरंग उबाळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, माजी सभापती सुभाष अव्हाड, मुंजेवाडीच्या सरपंच जानकाबाई ठकाण सह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, आपल्या जीवनामध्ये आपण किती लोकांना घडवतो, किती लोकांना निर्माण करतो आणि आपल्या सानिध्यात आलेल्या किती लोकांना आपण हवेहवेसे वाटतो, याच्यावरच माणसाचं जे काही जीवनामधलं,जनतेमधलं, समाजामधलं स्थान आहे ते आपल्याला कळत असतं, आजची अलोट गर्दी पाहून हजारे गुरूजींवर समाजाचं असलेलं प्रेम अधोरेखित होत आहे.
शिंदे पुढे म्हणाले, ऐकेकाळी अशी परिस्थिती होती, जवळा आणि जवळा पंचक्रोशीतील चार गुरूजी म्हणलं की, सगळे राजकारणी टवकारायचे,आले ब्वाॅ हे म्हणायचे, आणि त्यामुळं आळीपाळीनं सगळ्यांनी उलीउली तुम्हाला त्रास दिला.पण तुम्हाला त्रास देणाऱ्यात माझं नाव नाही, हे मी आजच्या सेवापुर्ती कार्यक्रमात सांगतो, कधी काळी तुमचं माझं जमलं नाही तरी देखील मी तुम्हाला त्रास दिला नाही, तुम्ही मला आज विचारू शकता कि त्रास का दिला नाही, कारण, मी पण शिक्षक होतो, मी कसा काय देणार, असे म्हणत शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शिंदे पुढे म्हणाले, कोणी कर्तृत्ववान आणि चांगली माणसं असली कि मी त्यांना प्रोत्साहन देतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेतो, चुकीच्या कामाला मी कधीच समर्थन दिलेलं नाही, शिक्षक असताना आपण जी काही डेव्हलपमेंट केली. 700 पेक्षा अधिक लोकांना हजारे गुरूजींनी रोजगार उपलब्ध करून दिला ही बाब अभिमानास्पद आहे, दशरथ हजारे गुरूजी यांनी विद्यार्थी घडवण्याचे काम आपल्या कारकिर्दीत केलं आहे. त्यांनी केलेलं काम समाजाला प्रेरणा आणि दिशा देणार आहे असे शिंदे म्हणाले.
यावेळी दशरथ हजारे यांनी आपल्या 36 वर्षाच्या सेवेत आलेले अनुभव कथन केले. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ सह आदींची भाषणे झाली. उपस्थितांनी दशरथ हजारे गुरूजी यांचा सेवापुर्ती निमित्त गौरव केला. या सोहळ्याने हजारे कुटूंब भारावून गेले होते. नागरी सत्कारानंतर उपस्थितांना गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली होती.
यावेळी जवळा सोसायटीचे चेअरमन शहाजी पाटील, मारुती रोडे, विष्णू हजारे,भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे, जवळा ग्रामपंचायत सदस्य उमेश रोडे, मुंजेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर महानवर, मुंजेवाडीचे उपसरपंच बाजीराव खाडे, पैलवान बाबासाहेब महारनवर, राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष शिंदे, बबन ठकाण, बापूराव ढवळे, ज्ञानेश्वर झेंडे, डाॅ अल्ताफ शेख, लक्ष्मण खाकाळ सर, उदयसिंह पवार, मोहन गडदे,महेंद्र मोहोळकर सुनील हजारे, सत्तार शेख,चंद्रकांत डोके जुन्नर, बाबासाहेब खराडे, बंडू सातव, भारत कुबेर अनिरुद्ध शिंदे, मधुकर गीते, लक्ष्मण हिंगणे, रामलिंग हजारे, विकास हजारे, सुभाष फसले, अमोल पवार, आप्पासाहेब मते, कानिफ मते, अनिल सरोदे सह मुंजेवाडी व जवळा पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास हजारे यांनी केले.