जामखेड : औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल आला अन् अंकुश शिंदे यांच्या विरोधकांवर ओढवली तोंडघशी पडण्याची नामुष्की !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : दोन वर्षापुर्वी मत चोरीच्या आरोपाने जामखेडच्या राजकारणात धुराळा उडवून देणाऱ्या अरणगाव सरपंच निवडीचा वाद औरंगाबाद हायकोर्टात दाखल झाला होता. अहमदनगर जिल्हाधिकारी व नाशिक विभागीय आयुक्त यांनी दिलेला निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे.या निर्णयामुळे अखेर या वादावर पडदा पडला आहे. यामुळे आता अरणगावच्या सरपंचपदी आमदार प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक अंकुश शिंदे हेच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधी गटाला जंगजंग पछाडूनही अंकुश शिंदे यांची खुर्ची घालवता आली नाही, यामुळे अंकुश शिंदे यांच्या विरोधकांवर तोंडघशी पडण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा जोरात रंगु लागली आहे.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या अरणगाव ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुक 9 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडली होती. या निवडणुकीत भाजप 5 राष्ट्रवादी 5 व अपक्ष 1 असे संख्याबळ निवडणूक आले होते. अरणगावकरांनी दोन्ही गटाला समसमान संधी दिल्याने सरपंच कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दोन्ही गटाने आपले सदस्य सहलीवर नेले होते.यावेळी राष्ट्रवादीकडे अपक्ष उमेदवारासह सहाचे संख्याबळ झाले होते. तर भाजपकडे पाचचे संख्याबळ होते. परंतू प्रत्यक्ष सरपंचपदाच्या निवडीवेळी भाजपने राजकीय चमत्कार घडवला होता.राष्ट्रवादीचे एक मत फुटल्याने सरपंच म्हणून अंकुश शिंदे हे विजयी झाले होते.तर उपसरपंचपदी सविता आप्पासाहेब राऊत यांची निवड करण्यात आली होती.
सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीचा सरपंचपदाचा उमेदवार विजयी न झाल्याने सरपंचपदाच्या उमेदवार व त्यांचे समर्थक तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सरपंच निवडीनंतर मोठा गोंधळ घातला होता. त्यानंतर सरपंचपदाच्या निवडणूकीत एका मताची चोरी झाल्याचा आरोप करत तीन दिवस गाव बंद ठेवण्यात आले होते. तसेच पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाला होता. परंतू पोलिसांत तक्रार दाखल करण्यात त्यांना यश आले नव्हते. मात्र अरणगाव सरपंचपदाच्या निवडीत गडबड गोंधळ झाल्याचा राष्ट्रवादीकडून आरोप झाल्याने अरणगावची सरपंचपदाची निवडणूक जामखेड तालुक्यात गाजली होती. आरोप प्रत्यारोपांचा मोठा धुराळा त्यावेळी उडाला होता.
अरणगाव सरपंचपदाच्या निवडीत एका मताची चोरी झाल्याचे प्रकरण अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमांतून राष्ट्रवादीने राजकीय दबावाचा वापर केला. त्यामुळे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच अंकुश शिंदे यांच्या विरोधात निकाल दिला होता. यावर शिंदे यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले होते. परंतू या अपिलातही शिंदे यांना दिलासा मिळाला नव्हता. विभागीय आयुक्त कार्यालयाने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेश कायम ठेवला होता. त्यामुळे सरपंच अंकूश अरूण शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात दोन्ही कार्यालयांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.
सरपंच अंकुश शिंदे यांनी ॲड अभिजीत मोरे व ॲड माधव जाधव यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात दाद मागितली होती. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्णयांवर त्यांनी स्टे मिळवला होता. त्यानंतर या प्रकरणाची हायकोर्टात सुनावणी पार पडली. हायकोर्टाने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेले निर्णय रद्द करण्याचा निकाल दिला. यात अरणगावचे सरपंच म्हणून अंकुश शिंदे यांची निवड कायम ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला.हायकोर्टाच्या या निकालामुळे सरपंच अंकुश शिंदे व त्यांच्या समर्थकांसह भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. 24 जूलै रोजी हायकोर्टाने हा निकाल जाहीर केला.
अरणगावच्या सरपंचपदावरून अंकुश शिंदे यांना पायउतार करण्यासाठी दोन वर्षांपासून जंगजंग पछाडणाऱ्या सरपंच शिंदे यांच्या विरोधकांच्या हाती काही न मिळाल्याने त्यांना मोठ्या नामुष्कीस सामोरे जावे लागले आहे. अंकुश शिंदे हेच आता अरणगावचे सरपंच म्हणून कायम राहणार असल्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.
दरम्यान, अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे यांनी न्यायालयीन लढाईत बाजी मारत सरपंचपद कायम ठेवल्याबद्दल आमदार प्रा राम शिंदे, खासदार सुजय विखे, भाजप तालुका अध्यक्ष अजय काशिद, पंचायत समिती सदस्य भगवान मुरूमकर, भाजपा विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, बापुराव ढवळे, पांडूरंग उबाळे,मार्केट कमिटीचे संचालक डॉ ससाणे, शहराध्यक्ष बिबिशन धनवडे, लोकसभा विस्तारक मनोज कुलकर्णी, अमोलशेठ शिंदे, माजीसरपंच आजिनाथ नन्नवरे, बबनराव पाटील, संतोष नन्नवरे सरचिटणीस लहूजी शिंदे,आंबदास राऊत,मधुकर राऊत, ॲड संजय पारे, गाहिनाथ डमाले, आप्पासाहेब राऊत, रमजान शेख, तात्याराम निगुडे, अविनाश पाटील, अंगद पाटील, बाळू पवार, ॲड मोहन कारंडे, दिलीप नन्नवरे, विठ्ठल नन्नवरे, आनंदराव शिंदे, जावेद मेजर, सोले मेजर, अवसरे महाराज, बंडू राऊत, राजू कोथमिरे,सचिन राऊत, विष्णू निगुडे, बापूसाहेब नन्नवरे, पालेकर साहेब, दिवटे साहेब,शंकरहरी पारे, रवि भोगे, ईश्वर बोरा, अतुल पाटील, पिंटू शिंदे, सोमा दळवी गोकुळ गनगे, अमोल निगुडे, जालिंदर पारे, रवि निगुडे, बंडू नन्नवरे, रावसाहेब पारे, राजू निगुडे, दिपक पालेकर, नागेश पारे, नंदू पारे, बबन पवार तसेच अरणगाव ग्रामस्थ व पारेवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.