जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ashadhi Wari 2023 : पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे जामखेड तालुक्यातील दिघोळ, मोहरी, खर्डा येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले.संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे जामखेड तालुक्यात आगमन होताच तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी दिघोळ येथे पालखीचे स्वागत केले. (Sant Eknath Maharaj Palkhi Sohala 2023)
संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पैठण येथून रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली यंदा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. या पालखी सोहळ्याचे ठिक ठिकाणी जंगी स्वागत होत आहे. हार-फुलांनी सजवलेल्या संत एकनाथ महाराज यांची पादुका असलेल्या पालखी सोबत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत.
या पालखीत सहभागी असलेले अश्व सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. खांद्यावर भगवी पताका घेऊन हरी नामाचा जागर करीत वारकऱ्यांसह डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी या पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
संत एकनाथ महाराज पालखीचे जामखेड तालुक्यातील दिघोळ, मोहरी आणि खर्डा शहरात जंगी स्वागत करण्यात आले.पालखी सोहळा दर्शनासाठी खर्डा परिसरातील भाविकांची मोठी गर्दी केली होती.
दिघोळ, मोहरी, खर्डा या भागात पालखी सोहळ्याचे आगमन होताच वारकऱ्यांसाठी गावात विविध ठिकाणी भोजन, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिघोळ येथे पालखीचा मुक्काम होता. मारूती मंदिर परिसरात सायंकाळी किर्तन पार पडले. दुसर्या दिवशी एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
जामखेड तालुक्यातील दिघोळ, मोहरी, खर्डा, या गावातून पालखी जात असल्यामुळे प्रशासनाने गेल्या आठ दिवसापासून या गावात योग्य नियोजन केले होते. यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक जानकर हे गेल्या आठ दिवसापासून दिघोळ गावात तळ ठोकून होते.
पालखी व्यवस्थेसाठी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी, ग्रामस्थांनी चोख जबाबदारी पार पाडली.