जामखेड : स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिले शिक्षकांना महत्वाचे आदेश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 30 जून 2023 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले तर ती मुले भविष्यात अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील होतील. त्यामुळे त्यांचा स्पर्धा परीक्षेचा (Competitive Examination) पाया भक्कम झाला पाहिजे. शिक्षकांनी स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेचे (Scholarship and Navodaya Exam) ज्यादा तास घ्यावेत, असा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (ZP Chief Executive Officer Ashish Yerekar) यांनी दिल्या असून त्याची जामखेड तालुक्यात काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ (BDO Prakash Pol) यांनी केले.
अवर्षणप्रवण जामखेड तालुक्यातून शेकडो लोक मोलमजुरीसाठी स्थलांतर करून जात असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. जामखेड तालुक्यात प्रचंड गुणवत्ता आहे, त्यासाठी शिक्षकांनी स्पर्धा परीक्षांचा प्राथमिक पाया मजबूत करण्याकडे लक्ष द्यावा. तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा सर्व वर्गाच्या वर्गशिक्षकांनी सकाळी साडेनऊ ते साडेदहा अशा वेळेमध्ये स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेचे ज्यादा तास घ्यावेत, या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे पोळ म्हणाले.
गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांची जामखेड पंचायत समितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी वरील सुचना दिल्या. तसेच अगामी काळात होणाऱ्या स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेचे काटेकोर नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
ऑगस्ट अखेर पूर्ण ही कामे पुर्ण करा
त्याचबरोबर शिक्षकांचे प्रशासनाकडे प्रलंबित असणारे अनेक विषय होते त्याचाही सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. वरिष्ठ वेतनश्रेणी, वैद्यकीय देयके, पुढील अभ्यासक्रमास परवानगी देणे, सेवा पुस्तक अद्ययावत करणे, गोपनीय अहवाल पूर्ण करणे अशा पद्धतीचे कामे प्रशासनाने विशेष शिबिर घेऊन ऑगस्ट अखेर पूर्ण करावे अश्या सूचना यावेळी पोळ यांनी शिक्षण विभागाला दिल्या.यावेळी गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी चव्हाण सर, जाधव सर तसेच सर्व केंद्रप्रमुख हजर होते.