जामखेड टाइम्स वृत्तसेवा । परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातल्याने अनेक गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. काढणीचा आलेले पिके पाण्यात गेली आहे. काही पिके सडली आहेत तर काहींना कोंब फुटले आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अश्या परिस्थितीत पंचनामे आधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबत प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
परतीच्या पावसाने जामखेड तालुक्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेल्या घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. यामुळे दिवाळीपुर्वीच बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे हाती घ्यावेत, अशी मागणी होत होती. त्यानुसार जामखेड तहसील कार्यालयाने पंचनामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जामखेड तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे उद्या 18 ऑक्टोबर 2022 पासुन जामखेड तालुक्यात सुरु होणार आहेत.सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावाचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपले नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे, असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत असताना शेतकऱ्यांनी आपली पिक पाहणीची नोंदही लगेच करून घ्यावी जेणेकरून अनुदान देणेकामी अडचण होणार नाही असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याबाबत जामखेड तहसील कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील ८३ गावांचे शेतीचे नुकसान पंचनामे सादर जामखेड तालुका कृषी अधिकारी यांचा दि. १८/१०/२०२२ रोजीचा प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
जामखेड तालुक्यातील तेलंगशी, धामनगांव, देवदैठण, जायभायवाडी शिवारात दि. १२/१०/२०२२ व १३/१०/२०२२ रोजी जोरदार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झालेबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झालेला होता त्यानुसार या कार्यालयाचे पत्र. कावि/ नैसर्गिक आपत्ती / १०५/२०२२ दि. १५/१०/२०२२ नुसार वस्तुनिष्ट पंचनामे दि. २०/१०/२०२२ पावेतो सादर करण्यास सबंधीताना आदेशीत केलेले आहे.
तसेच जामखेड तालुक्यातील उर्वरीत ८३ गावांचे नैसर्गिक आपत्तीमुळे दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या सतत व अवकाळी पाऊसामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्त व्यक्तींना मदत करणेकामी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासन निर्णय क्रमांक सीएलएस – २०१५ प्र.क्र.४०/म-३ दि.१३/०५/२०१५ व शासन निर्णय क्रमांक सीएलएस २०२२/प्र.क्र.२९९/ म ३ मुंबई दि. १३ ऑक्टोबर २०२२ नुसार अहवाल सादर करणेसाठी सदर ठिकाणचे वस्तुनिष्ट पंचनामे कार्यालयास तात्काळ सादर करणेकामी जामखेड तालक्यातील ८३ गावांचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवक यांची नेमणुक करण्यात आली आहे.
संबंधीत गावांचे ग्रामदक्षता समिती सदस्य तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी सदर शेतीचे वस्तुनिष्ट पंचनामे दि. २१/१०/२०२२ पर्यंत कार्यालयात सादर करावे. यात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी व पंचनामे करत असतांना ते वस्तुनिष्ठ असावे. ज्या ठिकाणी ३३ टक्के नुकसान झाले आहे तेथील पंचनामे करावेत असे आदेशात म्हटले आहे.
तलाठी कृषी सहाय्यक व सबंधीत गावचे ग्रामसेवक यांनी त्यांचे भागातील शेतीचे नुकसानबाबत शासन निर्णयानुसार बाधीत क्षेत्राचे Geo tag photo व वस्तुनिष्ट अहवाल तालुका कृषी कार्यालयास विहीत मुदतीत सादर करावेत असे आदेश जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आज दिले आहेत.