जामखेड : जवळा गाव बंद वरून भाजप आक्रमक, भूमिपुत्रांवर अन्याय होत असताना राष्ट्रवादीवाले मुग गिळून का गप्प बसले होते – भाजप युवा नेते उमेश रोडे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीवाल्यांना खरोखर मतदारसंघातील तरूणांच्या हाती रोजगार द्यायचा होता तर, हळगाव कारखान्यातील शेकडो स्थानिक भूमिपुत्रांना जेव्हा काढण्यात आले तेव्हा हेच राष्ट्रवादीवाले मुग गिळून गप्प का बसले होते. जामखेड एमआयडीसीत उद्योग व्यवसाय सुरु व्हावेत यासाठी जवळा गाव बंद करून भूमिपुत्रांना न्याय मिळवून का दिला नाही, एकिकडे भूमिपुत्रांवर अन्याय करायचा, अन दुसरीकडे युवकांच्या रोजगारासाठी लढतोय असं दाखवायचं असा राष्ट्रवादीवाल्यांचा ढोंगीपणा सुरु आहे, अशी खरमरीत टीका भाजपाचे युवा नेते उमेश रोडे यांनी केली आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंदोलन करत आहेत.परंतू रोहित पवार यांच्या हळगाव कारखान्यात कामावर असलेल्या शेकडो स्थानिक तरूणांचा रोजगार हिरवला गेला. तेव्हा राष्ट्रवादीवाल्यांनी जवळा गाव बंद ठेवून निषेध का नोंदवला नाही, स्थानिक तरूण कोणत्याही विचारसरणीचे असो, ते स्थानिक आहेत, त्यांचा रोजगार हिरावून घेऊ नये यासाठी आमदार रोहित पवारांना राष्ट्रवादीवाल्यांनी का भाग पाडले नाही, असा सवाल उमेश रोडे यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक युवकांचा हळगाव कारखान्यातून रोजगार हिरावून घेण्याचे पाप करणाऱ्या राष्ट्रवादीवाल्यांना जवळा बंद ठेवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. पक्षपातीपणा करून मतदारसंघात युवकांना राष्ट्रवादीवाले कधीच न्याय देऊ शकत नाहीत. जो निरव मोदी देशाला करोडो रूपयांचा चुना लावून विदेशात पळून गेला. त्याच्या नावावर शेकडो एकर जमीन पाटेगाव खंडाळ्यात आहे.याचा भांडाफोड आमचे नेते आमदार प्रा.राम शिंदे साहेबांनी विधानपरिषदेत केला आहे.
पाटेगाव – खंडाळा एमआयडीसी ही निरव मोदीसारख्या भ्रष्ट माणसासाठी तर उभारली जाणार नाही ना असा संशय आता जनतेला येत आहे. राष्ट्रवादीवाले मतदारसंघातील बेरोजगार युवकांच्या हक्कासाठी अंदोलन करत आहेत की नीरव मोदीसाठी ? असा सवाल उपस्थित करत भ्रष्टाचार्यांना साथ देण्यासाठीच राष्ट्रवादीवाल्यांचे अंदोलन सुरु आहे, भ्रष्टाचारी लोकांना साथ देणाऱ्यांना कर्जत-जामखेडची जनता कधीच माफ करणार नाही, असा इशारा रोडे यांनी दिला.
जवळा बंद अंदोलनास भाजपचा तीव्र विरोध आहे. स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार हिरावून घेणाऱ्या राष्ट्रवादीचे अंदोलन जनतेने उलथवून टाकावे, राष्ट्रवादीवाल्यांनी जामखेड एमआयडीसीत उद्योग व्यवसाय आणावेत यासाठी जवळा बंद अंदोलन का केले नाही, यातूनच राष्ट्रवादीचा दुतोंडी चेहरा उघडा पडत असल्याची टीका भाजपा युवा नेते उमेश रोडे यांनी केली आहे.