ब्रेकिंग न्यूज : रस्त्याच्या वादातून मोहरीत 53 वर्षीय शेतकऱ्याची हत्या, भावकीच्या चौघांविरोधात खुनाचे गुन्हे दाखल, खुनाच्या घटनेने जामखेड तालुका हादरला
जामखेड टाइम्स वृत्तसेवा, 03 जूलै 2023 : जामखेड तालुक्यातील मोहरी येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून भावकीचा मोठा वाद उफाळून आला. यावेळी झालेल्या मारहाणीच्या घटनेत 53 वर्षीय शेतकऱ्याचा खून झाला आहे. खुनाच्या या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना खर्डा पोलिस स्टेशन हद्दीतून उघडकीस आली आहे. शेतीच्या वादातून खूनाची घटना घडल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. या खून प्रकरणी 4 जणांविरोधात खूनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत खर्डा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहरी गावातील हाळणावर कुटूंबात शेतीच्या रस्त्याचा वाद होता. याच वादातून आज 3 जूलै 2023 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास हाळणावरवस्तीवर भावकीच्या दोन गटांत शेतीच्या रस्त्याचा मोठा वाद उफाळून आला. यावेळी झालेल्या मारहाणीत अशोक धोंडीबा हाळणावर वय 53 या शेतकऱ्यांचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनला मयताचा मुलगा आनंद आशोक हाळणावर वय 30 यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार युवराज बाबासाहेब हाळणावर, दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, नवनाथ सिताराम हाळणावर, आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा. हाळणावर वस्ती, मोहरी ता. जामखेड या चौघा आरोपींविरुद्ध कलम 302, 323, 504, 506,34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यावेळी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीचे मयत वडिल यांना आरोपींनी शिविगाळ, जिवे मारण्याची धमकी देवुन आरोपी दत्तात्रय बाबासाहेब हाळणावर, नवनाथ सिताराम हाळणावर,आप्पा नवनाथ हाळणावर या तिघा आरोपींनी मयताला हाताने मारहाण केली. व आरोपी युवराज बाबासाहेब हाळणावर याने त्याचे हातातील कु-हाडीने मयताचे मानेवर, गळ्यावर मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारले आहे. शेतीच्या रस्त्याच्या वादातून ही घटना घडली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करित आहेत.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विवेकानंद वाखारे, सपोनी महेश जानकर, पोना संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल वैजीनाथ मिसाळ, शशी मस्के, अशोक बडे बाळु खाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.खुनाच्या घटनेमुळे मोहरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहिम उघडली आहे.