BSNL : जामखेड तालुक्यात उडाला बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा, ग्राहक नव्या पर्यायाच्या शोधात !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्रामीण भागातील ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा सतत बोजवारा उडत असल्याने ग्राहकांकडून आता नव्या पर्यायाचा शोध घेतला जाऊ लागला आहे.

BSNL internet service has disturbed In Jamkhed taluka, bsnl customers are looking for new option, jamkhed news today,

बीएसएनएल भारत फायबर द्वारे पुरवल्या जाणार्‍या ब्राॅडब्रँड इंटरनेट सेवेकडे ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या विश्वासाने जोडले जात असतानाच जामखेड तालुक्यातील काही भागात  ही सेवा नियमित विस्कळीत होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बीएसएनएलची इंटरनेट सेवा सतत खंडीत होत असल्याने ऑनलाईन कामकाज ठप्प होत आहे.ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

बीएसएनएल भारत फायबर सेवा महावितरणच्या वीजेप्रमाणे झाली आहे.लाईट कधी येते अन् कधी जाते याचा काही नियम नाही तशीच अवस्था बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेची झाली आहे. दिवसातून अनेकदा ही सेवा खंडीत होते, कधी कधी दिवसभर ही सेवा बंद राहते.इंटरनेट सेवा खंडीत होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.त्याचबरोबर आयटी कंपन्यांसाठी वर्क फाॅर्म होम अंतर्गत काम करणारांना इंटरनेट सेवा खंडीत होत असल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे.

जामखेड तालुक्यातील नान्नज, जवळा, हळगाव, चोंडी, फक्राबाद, पिंपरखेड, अरणगाव, पाटोदा, सह आदी गावातील सेवा सतत खंडीत होत आहे.या भागात 200 पेक्षा अधिक बीएसएनएल इंटरनेटचे ग्राहक आहेत. या भागातील स्टेट बँक, जिल्हा बँक, सेंट्रल बँक, आयसीआयसीआय बँक, पतसंस्था, ग्राहक सेवा केंद्र यांच्या इंटरनेट सेवा सतत विस्कळीत होत असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. सध्या पीएमकिसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.इंटरनेट बंद असल्याने बँकामधून पैसे काढण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

BSNL internet service has disturbed In Jamkhed taluka, bsnl customers are looking for new option, jamkhed news today,

त्याचबरोबर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल यांचीही शैक्षणिक कामे इंटरनेट नसल्यामुळे ठप्प झाली आहेत. सध्या 10 वी व 12 वीच्या परिक्षा आहेत. या परिक्षा काॅपी मुक्त व्हाव्यात यासाठी परिक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने हे सीसीटीव्ही बंद पडत आहेत.त्यामुळे परिक्षा केंद्रावर नेमकं काय चाललयं याचे चित्रिकरण होत नाही.

बीएसएनएलची इंटरनेट सेवा का खंडीत होते ? याबाबत संबंधिताना विचारणा केली असता अमूक ठिकाणी केबल तुटली, तमूक ठिकाणी केबल तुटली, मेन लाईन तुटली, असे कारण सांगून ग्राहकांची बोळवण केली जात आहे. केबल तोडणारांविरोधात बीएसएनएलने आजवर कधीच मोठी कारवाई केली नाही. ग्राहकांना उत्तम सेवा देण्याऐवजी मनस्ताप देण्याचेच काम बीएसएनएलकडून सुरु असल्यामुळे ग्राहकांकडून नव्या पर्यायाचा शोध घेतला जाऊ लागला आहे.

जामखेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील बीएसएनएल भारत फायबरची सेवा खंडीत होण्यासाठी कारणीभूत ठरणारांविरोधात बीएसएनएलने तातडीने कारवाई हाती घ्यावी अशी मागणी ग्राहकांमधून आता जोर धरू लागली आहे. बीएसएनएलने इंटरनेट सेवा सुरळीत होण्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास ग्राहक बीएसएनएलला टाटा बाय बाय करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बीएसएनएलने इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या जलजीवन योजनेची कामे सुरु आहेत. या कामांमुळे बीएसएनएल केबल तुटण्याचे प्रमाणे वाढले आहे, अशी माहिती आहे. जलजीवनच्या संबंधित ठेकेदाराविरुद्ध बीएसएनएलने कारवाई हाती घेण्याची आवश्यकता आहे.

shital collection jamkhed