जामखेड तालुक्यात सोमवारी कोरोना थंडावला पण धोका कायम

२० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात रविवारी कोरोनाचा महाउद्रेक झाल्याचे समोर आले होते. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. एकाचवेळी एकाच दिवशी कोरोनाचे १७८ रूग्ण निघताच सर्वांचीच झोप उडाली होती.

सोमवारी कोरोना कोणते रूप दाखवणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. सोमवारी तालुक्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.सोमवारी कोरोना थंडावला आहे.

 

सोमवार दि २६ जुलै रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने दिवसभरात ८२८ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४७४ नागरिकांचे स्वॅबनमुने RTPCR कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत.

सोमवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये जामखेड ०५, रत्नापुर ०१, जवळके ०६, शिऊर ०२, साकत ०२ व कुसडगाव ०३ तर RTPCR अहवालात खर्डा ०१ असे एकुण २० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

 

सोमवारी कोरोना थंडावल्याने तालुक्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.मात्र कोरोनाचा मोठा धोका तालुक्यात कायम असुन नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सुरू ठेवणे आवश्यक आहे.