जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यातील धानोरा – वंजारवाडीच्या ग्रामसेवकाविरूध्द मुख्यमंत्री कार्यालयाकडे ईमेलद्वारे केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे तक्रार रवाना केली आहे. त्यामुळे आता लवकरच ‘त्या’ ग्रामसेवकाविरूध्द थेट मंत्रालयातूनच कारवाईचा ससेमिरा लागणार असल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
जामखेड तालुक्यातील धानोरा – वंजारवाडी ग्रामपंचायतीमध्ये नियुक्तीस असलेले ग्रामसेवक महिनाभरापासून गैरहजर आहेत. ग्रामसेवक गैरहजर राहत असल्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी युवा नेते गणेश विठ्ठल ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची भेट घेत ग्रामस्थांना येत असलेल्या अडचणींची कैफियत मांडली.
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना गणेश ओंबासे आणि ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे, यात म्हटले आहे की, धानोरा वंजारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गेल्या महिनाभरापासून गैरहजर आहेत. ग्रामसेवक येत नसल्याने ग्रामपंचायत सतत बंद असते. ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, ग्रामपंचायतचा कारभार राम भरोसे सुरू आहे. ग्रामपंचायतचा कारभार संशयास्पद आहे. गेल्या अडीच वर्षांत एकदाही ग्रामसभा झाली नाही असा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, धानोरा -वंजारवाडी ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारात सुधारणा व्हावी यासाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयात बोंबाबोंब आणि ठिय्या अंदोलन हाती घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर गणेश ओंबासे, भागवत जायभाय, मनोज जायभाय, विठ्ठल जायभाय, विजय जायभाय, केशव गोल्हार, बाळू जायभाय सह आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान युवा नेते बाळू जायभाय यांनी ग्रामसेवकाविरूध्द थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभागाकडे ती तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे.त्यामुळे आता धानोरा – वंजारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश थेट मंत्रालयातून होणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेले उत्तर ⤵️
ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना दिलेले निवेदन