जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 21 ऑक्टोबर 2022 । जोरदार पावसामुळे पाटोदा येथील भवर नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा पुल पुन्हा वाहून गेला आहे. त्यामुळे जामखेडहून कर्जत आणि श्रीगोंद्याला जाणारी वाहतुक बंद झाली आहे. मागील पंधरा दिवसातली ही तिसरी घटना आहे. ऐन दिवाळीत हा रस्ता पुन्हा बंद झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
जामखेड तालुक्यासह शेजारील आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. पाटोदा येथून वाहणार्या भवर नदीला आष्टी तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. याचा फटका या नदीवर उभारलेल्या तात्पुरत्या पुलाला तीनदा बसला आहे. हा पुल मागील पंधरा दिवसात तीनदा वाहून गेला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ते जामखेड या भागापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. याच भागातील जामखेड ते अरणगाव या मार्गावरील पाटोदा (गरडाचे) या ठिकाणी भवर नदीवरील मुख्य पुलाचे काम सुरु आहे.या भागातील वाहतुकीसाठी ठेकेदार कंपनीने तात्पुरता मातीचा पुल उभारला होता.
परंतू हा पुल दमदार पावसामुळे पुल वाहून जाण्याची आजची तिसरी घटना आहे. यामुळे पुन्हा जामखेडहून अरणगाव – कर्जत – श्रीगोंदा कडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.ऐन दिवाळीत विघ्न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून भवर नदीला तीनदा पुर येण्याची घटना घडली. यामुळे भवर नदीवरील तात्पुरता पुल वाहून गेला. पहिल्या आणि दुसऱ्या घटनेनंतर पुलाची उंची वाढवण्याची मागणी झाली. त्यानुसार मोठ्या नळ्या टाकून नवा पुल उभारला गेला. पण तोही 20 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला. यामुळे जामखेडहून अरणगाव – कर्जत – श्रीगोंदा कडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.
दरम्यान, पाटोद्याचा पुल वाहून गेल्यामुळे वाहतूक अरणगाव – फक्राबाद- कुसडगाव मार्गे जामखेडला वळविण्यात आली आहे. या मार्गाचा प्रवाश्यांनी वापर करावा असे अवाहन पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी केले आहे.
दरम्यान, पाटोदा येथील पुल वाहून गेल्याने ग्रामस्थांनी लोखंडी पाईप टाकून धोकादायकरित्या त्यावरून पायी ये जा सुरु केली आहे. विशेषता : विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून येजा करावी लागत आहे. काही जण मोटारसायकली घालण्याचे धाडस करत आहेत. यामुळे या भागात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने उपाय योजना हाती घ्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.