काळजी करू नका, जवळा ग्रामपंचायतला काहीच कमी पडू देणार नाही; निधीची पुर्ण जबाबदारी माझी – आमदार प्रा राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । 4 जानेवारी 2024 : प्रशांत शिंदे व त्यांचे सर्व सहकारी पक्षात आपल्याबरोबर जवळा गावासाठी 25 लाखाचा निधी दिलाय.अजून काय पाहिजे ते सांगा. पुढील पाच वर्षे जवळा ग्रामपंचायतला निधीची कसलीही अडचण येणार नाही, त्याची पुर्ण जबाबदारी माझी. सावता महाराज मंदिर आणि परिसराचा जो विकास आवश्यक आहे तोही करू, अशी घोषणा आमदार प्रा.राम शिंदे यांनी जवळा येथे बोलताना केली.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथील युवा नेते प्रशांत शिंदे मित्र मंडळाच्या वतीने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राम शिंदे बोलत होते. तत्पुर्वी प्रचंड जनसुदायाच्या उपस्थितीत आमदार प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेषता: महिलांची उपस्थिती प्रचंड होती.
जवळा गावाला कधी निवेदन देण्याची किंवा कोणते काम सांगायची आवश्यकता नाही आणि कोणतं काम सांगितलयं मला अन् झालं नाही, अस कधी झाले नाही. न सांगता भरपूर कामे झाली. भरपूर निधी दिला. जवळेश्वर मंदिर देवस्थानाच्या विविध विकास कामांसाठी निधी द्या असे कोणीही निवेदन दिलेले नाही. मात्र दिड कोटी रूपयांचा निधी दिल्याचे उदाहरण यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सांगितले.
आमदार शिंदे यांनी व्यक्त केली कृतज्ञता
जवळा ही माझी कर्मभूमी आहे. जवळा गाव जर माझ्यामागे उभे राहिले नसते, तर आज मी तुम्हाला अश्या परिस्थिती उभा राहिलेला दिसलो नसतो. पंचायत समितीची पहिली निवडणूक जिंकुन आणण्याचे काम जवळा गावाने केले. तेथून जी सूरूवात झाली. ती इथपर्यंत आली. मी आज जो काही उभा आहे तो फक्त जवळा गावामुळे आहे, अशी कृतज्ञता यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केली.
लहानपणी माझ्या मनात जे यायचं तसं वागण्याचा माझा प्रयत्न
राजकारणात अनेक लोकं येतात, अनेक लोकं जातात, लोकशाहीच्या मार्गाने जिंकतात, ते पदाधिकारी होतात. त्यांना सत्ता प्राप्त होते. त्या सत्तेचा लोकांना किती उपयोग होतो. तोच खऱ्या अर्थानं जनतेच्या जनभावनेचं नेतृत्व करू शकतो, असे सांगत मी ज्या कुटूंबात जन्म घेतला, ज्या गरिबीच्या झळा सोसल्यानंतर मी उच्चशिक्षित झालो. त्यानंतर सामाजिक व राजकीय जीवनात प्रवेश करताना मी ठरवलं होतं की, मी लहान असताना मला कोणी अधिकाऱ्याने किंवा पुढाऱ्याने लोकांशी कशी मदत करावी हे जसं माझ्या मनात यायचं तसं मी वागण्याचा माझ्या राजकीय कारकीर्दीत प्रयत्न करतो, असे आमदार प्रा राम शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
बिगर वशिल्याचा विधानपरिषदेचा आमदार झालो
बोधले महाराज तुम्ही म्हणताय तसा मी नशिबवानचयं, विधानसभेला पडलो तरी आमदार झालो. माझा वशीला लावायला कोणीच नव्हतं, तरी पण बिगर वशिल्याचा विधानपरिषदेचा आमदार झालो.असा आमदार झालेला मी पहिलाच आहे, असे सांगत शिंदे पुढे म्हणाले पुर्वीच्या काळी राजाच्या घरात जो जन्मला यायचा तोच राजाचा उत्तराधिकारी व्हायचा पण आता तसं नाही. जो जनतेच्या मनावर राज्य करेल, जनतेच्या मनावर आदरभाव निर्माण करेल तो खऱ्या अर्थाने जनतेचा राजा होतो. जनतेचा लोकप्रतिनिधी होतो, असे यावेळी आमदार शिंदे म्हणाले.
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्याचा नवा पायंडा पाडला – आमदार राम शिंदे
माझं काहिही झालं तरी मी अजून पाच आमदार आहे. त्यामुळे काळजी करू नका.जनतेतून आमदार झाल्यावर तर मग अजून जोरात होईल. मी शब्द न देता सुध्दा पाळणारा माणूस आहे. एकदा शब्द दिल्यावर शंभर टक्के तो मी पाळतो त्यामुळे काहीही काळजी करू नका, असे सांगत दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्जत-जामखेडमधील माझ्या कार्यकर्त्यांनी समाजाभिमुख उपक्रम राबवत माझा वाढदिवस साजरा केला. सामाजिक कार्याचा नवा पायंडा कार्यकर्त्यांनी पाडला, असे आमदार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, नगरसेवक अमित चिंतामणी, ॲड प्रविण सानप, भाजपचे तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, उपसरपंच प्रशांत शिंदे , भाजपा वैद्यकिय आघाडीचे तालुकाध्यक्ष डाॅ.दिपक वाळुंजकर, सरपंच सुशील आव्हाड, सदस्य राहूल पाटील, काकासाहेब वाळुंजकर, सुभाष रोडे, नितीन कोल्हे , हरिदास हजारे, सावता हजारे, पांडुरंग शिंदे, भाऊ महारनवर, अनिल हजारे , महेंद्र खेत्रे, पांडुरंग रोडे, मुंजेवाडीचे सरपंच बाबासाहेब महारनवर, राजाराम सूळ, दत्तात्रय हजारे डाॅ. ईश्वर हजारे, वैभव हजारे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.