Jamkhed News : तहसीलदार गणेश माळी यांच्या प्रयत्नातून हळगाव कृषी महाविद्यालयातील पाणी टंचाई झाली दुर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या पाठपुराव्याला यश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। तहसीलदार गणेश माळी यांच्या प्रयत्नातून जामखेड हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयासाठी पाण्याचा टँकर सुरु करण्यात आला आहे. तीव्र पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या कृषि महाविद्यालयाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याचा टँकर सुरु व्हावा यासाठी महाविद्यालय स्तरावरून सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांचा गेल्या पाच महिन्यांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यास यश मिळाले आहे. प्रशासनाने आजपासून हळगाव कृषि महाविद्यालयासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु केला आहे.
जामखेड तालुक्यात गतवर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक भागांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तीव्र पाणीटंचाईचा फटका हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयालाही बसला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी असे 350 अधिक जन पाणी टंचाईचा सामना करत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयातील पाणी टंचाई निर्माण झाली असून शासनाने महाविद्यालयासाठी त्वरित पाण्याचा टँकर सुरु करावा अशी मागणी सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना नोव्हेंबर महिन्यात पत्र लिहून केली होती. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रशासनाने हळगाव कृषि महाविद्यालयातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा टँकर सुरु केला आहे.
आज 22 मार्च रोजी कृषि महाविद्यालयासाठी 20 हजार लीटर क्षमतेचा पाण्याचा टँकर सुरु करण्यात आला आहे. तहसीलदार गणेश माळी यांच्या प्रयत्नातून हळगाव कृषि महाविद्यालयासाठी टँकर उपलब्ध झाला आहे. महाविद्यालयासाठी टँकर उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी आनंदून गेले आहेत. कृषि महाविद्यालयात पाण्याचा टँकर दाखल होताच सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
यावेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. दत्तात्रय सोनावणे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोज गुड, डॉ. राहुल विधाते, डॉ. महेश निकम, डॉ. अंबादास मेहेत्रे, श्री. नवनाथ शिंदे, डॉ. निकीता धाडगे, डॉ. प्रणाली ठाकरे, डॉ. उत्कर्षा गवारे, प्रा. अर्चना महाजन, शिक्षकेतर कर्मचारी संजय आढाव, महेश सुरवसे, संभाजी ठवाल, प्रदीप धारेकर,किरण अरसुल, संजय सोनावणे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या जागेतील एका विहिरीवरून पिण्याच्या पाण्यासाठी तसेच अन्य वापराच्या पाण्यासाठी या विहीरीवरून पाण्याचा वापर करण्यात येत होता. मात्र यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे ही विहीर कोरडी पडल्याने आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने, महाविद्यालयाला विकत पाणी घेण्याची वेळ आली होती. पाणी मिळण्यास मर्यादा येत असल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.
महाविद्यालयासाठी प्रतिदिन किमान 40 हजार लिटर पाण्याची आवश्यकता होती. पाणी टंचाईने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय होत होती. त्यातच नव्याने केलेल्या वृक्षलागवडीवर याचा परिणाम पाहावयास मिळत होता. परंतू आता तहसीलदार गणेश माळी यांच्या प्रयत्नातून महाविद्यालयास दररोज टँकरद्वारे पाणी मिळणार आहे. यामुळे महाविद्यालयाच्या पाणी टंचाईवर मात करण्यात यश आले आहे. महाविद्यालयासाठी सध्या वीस हजार लिटर क्षमतेचा टँकर सुरु करण्यात आला आहे. आणखीन 20 हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे.