जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या भागात मोठी दुर्घटना होऊ नये, यासाठी भवर नदीवरील तात्पुरत्या पुलाची उंची वाढवण्याचे काम आज 12 रोजी सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे अरणगाव पाटोदामार्गे जामखेडला जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. प्रवाश्यांनी जामखेडला जाण्यासाठी अरणगाव, पिंपरखेड, फक्राबाद, कुसडगाव, जामखेड या मार्गाचा वापर करावा, असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
काल 11 रोजी जामखेड तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. पाटोदा परिसरातही सायंकाळी दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे भवर नदीला पाणी आल्याने नदीवरील तात्पुरता पुल पाण्याखाली गेला होता. यामुळे जामखेडहून पाटोदामार्गे कर्जत आणि श्रीगोंद्याकडे जाणारी वाहतुक बंद झाली होती.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाअंतर्गत पाटोद्यातील भवर नदीवर सध्या नव्या पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्पुरता बायपास रस्ता आणि पुल उभारण्यात आला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या भागात झालेल्या दमदार पावसामुळे हा पूल वाहून गेला होता. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी नवा तात्पुरता पूल आणि रस्ता बनवण्यात आला होता. मात्र काल 11 रोजी सायंकाळी पुन्हा हा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतुक बंद करण्यात आली होती.
11 रोजी रात्री जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तातडीने पाटोद्याला भेट देत नदीची पाहणी केली होती. तात्पुरत्या पुलाची उंची कमी असल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणून या भागात पुलाची उंची वाढवण्याबरोबरच रस्त्याची रुंदी वाढवण्याची सुचना तहसीलदार योगेश चंद्रे यांनी संबंधितांना दिल्या होत्या.
त्यानुसार आज 12 रोजी पाटोदा पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पाटोद्यातील पुलाच्या दोन्ही बाजूस चाऱ्या खांदून रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, अशी माहिती पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी दिली.