E-Peek Pahani 2022 |जामखेड तालुक्यातील 60 हजार खातेदारांची ई पिक पाहणी प्रलंबित, ई पिक पाहणी नोंद न झाल्यास भविष्यात निर्माण होणार अडचणी, शेतकरी बांधवांनी तातडीने ई पिक पाहणीची नोंद करून घ्यावी – योगेश चंद्रे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। “माझी शेती माझा सातबारा – मीच लिहील माझा पीकपेरा” या धोरणानुसार जामखेड तालुक्यातील ६२ हजार २०० खातेदारांची पिक पाहणी नोंद प्रलंबित आहे. पिक पाहणी नोंद न झाल्यामुळे भविष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनी तातडीने पिक पाहणीची नोंद करून घ्यावी, असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
“माझी शेती माझा सातबारा – मीच लिहील माझा पीकपेरा” या धोरणानुसार प्रत्येक खातेदाराने आपल्या शेतात केलेल्या पिकाचा पीकपेरा स्वतः नोंद करायचा आहे. सध्या खरीप हंगाम चालू आहे. सुधारित पिक पाहणी एपच्या (e-peek Pahani App) माध्यमांतून खरीप पिक पाहणी करण्याचे काम चालू आहे. परंतू जामखेड तालुक्यातील हजारो शेतकरी खातेदारांनी पिक पाहणीची नोंद केलेली नाही.
जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तलाठी यांच्या मार्फत पिक पाहणीबाबत प्रचार प्रसिद्धी केलेली आहे. मार्गदर्शन कॅम्प घेतेलेले आहेत, तरीही पिक पाहणीच्या नोंदीबाबत खातेदारांची उदासीनता दिसून येत आहे.पिक पाहणी न झाल्यामुळे पिक विमा, खरेदी विक्री, नुकसान भरपाई अनुदान या शासनाच्या विविध योजनासाठी अडचणी येऊ शकतात.
सद्यपरिस्थितीत ऑनलाईन पीक पाहणी तलाठी यांना करता येत नाही त्यामुळे पिक पाहणी तलाठी करून घेतील या मानसिकतेत न राहता प्रत्येक खातेदार यांनी आपल्या पिकाचा पीकपेरा स्वतः करुन घेण्याची आवश्यकता आहे.पिक पाहणी करत असताना काही तांत्रिक अडचणी आल्यास आपल्या गावाच्या तलाठी यांच्याशी संपर्क करावा.
जामखेड तालुक्यातील ७१ हजार २०० खातेदार आहेत त्यापैकी फक्त ९ हजार खातेदारांनी पिक पाहणीची नोंद केली आहे. अजून ६२ हजार २०० खातेदारांची पिक पाहणी नोंद प्रलंबित आहे. पिक पाहणी नोंद न झाल्यामुळे पिक विमा, खरेदी विक्री,नुकसान भरपाई अनुदान या शासनाच्या विविध योजनासाठी भविष्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनी तातडीने पिक पाहणी करून घ्यावी, असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
सर्व खातेदार यांना शासनाने आपल्या शेतातील पिक पेरा स्वतः नोंद करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याचा तालुक्यातील सर्व खातेदार यांनी लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपली पिक पाहणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.