जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वाच्या असलेल्या जवळा सेवा संस्थेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. सेवा संस्थेच्या निवडणुकीमुळे जवळा गावचे राजकारण भलतेच तापले आहे.13 जागांसाठी 64 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज छाननी होणार आहे. अर्ज माघारीच्या दिवशी येथील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जवळा सेवा संस्थेच्या निवडणुकीत माजी उपसभापती दिपक पाटील, शहाजी पाटील व ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे सह त्यांच्या सर्वपक्षीय सहकारी नेत्यांच्या गटाने 44 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर सरपंच प्रशांत शिंदे, माजी सभापती सुभाष आव्हाड, जेष्ठ मुरलीधर हजारे, जेष्ठ नेते दशरथ कोल्हे यांच्या गटाने 20 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत स्थानिक गटांमध्ये थेट सामना रंगणार आहे. अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने येथील निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. “जवळा सेवा संस्थेवर आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी सहकारातील दिग्गज एकत्र आले आहेत. तर या निवडणुकीच्या माध्यमांतून प्रशांत शिंदे व त्यांच्या गटाने प्रथमच सहकाराच्या राजकारणात उडी घेतली आहे.”
आमदार रोहित पवार यांनी सरपंच प्रशांत शिंदे यांना बळ दिल्याची चर्चा आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांनी निवडणुकीच्या रिंगणात आपला पॅनल उतरवला आहे. प्रशांत शिंदे यांना रोहित पवारांकडून सर्व रसद पुरवली जाणार आहे. दोन्ही गटाकडे सर्वपक्षीय उमेदवार असल्याने पवार व शिंदे यांचा कस लागणार आहे. त्यामुळे माजी मंत्री राम शिंदे व आमदार रोहित पवारांकडून सेवा संस्था आपल्या ताब्यात यावी यासाठी कोणते डावपेच राबवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहकाराच्या राजकारणात जवळा सेवा संस्था महत्वपूर्ण आहे. या संस्थेवर आपला ताबा रहावा यासाठी राजकीय नेते सर्वस्व पणाला लावतात. यंदा होणारी निवडणूक स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे, परंतू या निवडणुकीला रोहित पवार विरूध्द राम शिंदे या संघर्षातून काहीसे पाहिले जात आहे. दोन्ही नेत्यांकडून सेवा संस्थेवर आपल्याच गटाची सत्ता असली पाहिजे यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे.
जवळा सेवा संस्थेवर ‘ज्या’ गटाची सत्ता येईल ‘त्या’ गटाचे तालुक्याच्या राजकारणात ‘राजकीय वजन’ वाढणार आहे. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जवळ्याला मोठे महत्व असणार आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांना फायद्या तोट्याचा राजकीय हिशोब आणि गोळाबेरीज पाहून राजकीय निर्णय घ्यावे लागणार आहेत. सेवा संस्थेच्या राजकारणातून अगामी निवडणुकांचे राजकीय गणिते निश्चित होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
दरम्यान जवळ्यात राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. कुणाची उमेदवारी ठेवायची ? कोणाची कापायची यासाठी सर्वच नेत्यांकडून खलबते सुरू आहेत. नाराजी वाढू नये यासाठी बैठकांमधून मनधरणी केली जात आहे. तापत्या उन्हात जवळ्यात राजकीय उकाडा अधिकच वाढला आहे. यामुळे येथील निवडणुकीत येत्या काही दिवसांत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ घडल्यास आश्चर्य ठरू नये अशी परिस्थिती आहे.