Jawaleshwar Rath Yatra 2023 : राज्यातील प्रसिध्द जवळेश्वर यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ, यात्रेला दोनशे वर्षांची परंपरा, गुरूपोर्णिमेला होणार रथयात्रेची सांगता !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा, ३० जून २०२३: दोनशे वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या प्रसिध्द जवळेश्वर रथयात्रोत्सवाला गुरूवारी (ता.२९) आषाढी एकादशी दिवशी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.आषाढी एकादशी ते गुरूपोर्णिमा असे पाच दिवस ही यात्रा साजरी होणार आहे. राज्यात साजऱ्या होणाऱ्या मोठ्या आषाढी यात्रांमध्ये जवळेश्वराच्या रथ यात्रेला महत्वाचे स्थान आहे. यामुळे राज्यभरातील भाविक यात्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. (Jawaleshwar Rath Yatra 2023)
जामखेड तालुक्यातील जवळा येथील जवळेश्वराची रथयात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. रथयात्रेची ही प्रथा अंदाजे २०० वर्षापूर्वींपासून असावी असे जाणकार मंडळी सांगतात. आषाढी एकादशीच्या दिवशी जवळेश्वराची आरती करून यात्रेस प्रारभ होतो. रात्री ९ वाजल्या पासून गावातील एकूण १० मंडळाच्या नर्तिकांचे नाचगाण्याचे कार्यक्रमाचे ठिकठिकाणी चालतात. रात्री दिडच्या सुमारास सर्व मंडळाच्या नर्तिका जवळेश्वर मंदिरा समोर येऊन आरती करतात. यात्रेदरम्यान जवळेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी असते.
पाचव्या दिवशी म्हणजेच ३ जुलै २०२३ रोजी गुरूपोर्णिमेनिमित्त मुख्य रथयात्रा साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळी जवळेश्वराची आरती करून जवळेश्वर मुकुटाची रथामध्ये विधीवत प्राण प्रतिष्ठापणा केली जाते. यावेळी भाविक रथाला नैवैद्य अर्पण करतानाच नाराळाचे तोरण रथावर चढवतात. ही नारळांची संख्या १० ते १५ हजार पर्यंत असते.
दुपारी एकच्या सुमारास जवळेश्वराची आरती करून मंदिरासमोरून रथाची मिरवणूक हर हर महादेवाच्या गजरात आणि जवळेश्वराच्या जयघोषात मुख्य रस्त्यावरून काढण्यात येते.रथास नाडे (दोर ) लावून भाविक रथ ओढतात.
सायंकाळी रथ वेशीतून आत आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करतानाच मारुतीच्या मंदिरासमोर दहीहंडी फोडून आनंद साजरा केला जातो. मध्यरात्रीपर्यंत रथ जवळेश्वर मंदिरासमोर येतो. त्यावेळेस गावातील सर्व मंडळाच्या नर्तिका वाद्यवृद पथके जवळेश्वर मंदिराच्या प्रांगणात एकत्र येतात यावेळी होणारी जुगलबंदी पाहण्यासारखी असते.
जवळा पाच ऋषीची पांढर.
जवळा गाव पाच ऋषींची पांढर म्हणून प्रसिध्द आहे. जवळेश्वर, बाळेश्वर, काळेश्वर, नंदकेश्वर व बेलेश्वर असे हे पाच स्वयंभू शिवलिंग म्हणजेच पाच ऋषी मानले जातात. पाच शिवलिंगापैकी एक जवळेश्वराचे मुख्य मंदिर आहे. जवळेश्वर मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी शके १७१९ ला बांधले आहे.दोन शिवलिंगे बाळेश्वर आणि काळेश्वर गावातच असून, नंदकेश्वर हे शिवलिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या बारवेत आहे. जवळेश्वराचे मंदिर अतिभव्य असून, हेमाडपंथी पध्दतीचे आहे.१२५ वर्षांहून अधिक जूना राज्यातील एकमेव जवळेश्वर रथ असल्याचे मानले जाते
शिखर बांधल्यावरच दुसरा मजला बांधण्यास प्रारंभ.
जवळेश्वर मंदिराला अलिकडच्या काळापर्यंत शिखर नव्हते.त्यामुळे जवळा आणि परिसरातील लोक स्वताच्या घरावर दुसरा मजला बांधत नव्हते. मंदिराला शिखर नसल्याने घरावर दुसरा मजला बांधल्यावर पडतो अशी लोकांची भावना असल्याने सन १९९६ पर्यंत कोणीही घरावर दुसरा मजला बांधला नव्हता. २७ वर्षापुर्वी लोकवर्गणीतून शिखर बांधण्यात येवून सोमवार ८ जून १९९६ रोजी विधीपुर्वक मंदिरावर कळस बसविण्यात आला. त्यानंतर जवळा येथे मोठ्या संख्येने दोन, तीन व चार मजली इमारती उभ्या राहू लागल्या आहेत.
पर्यटन विभागाकडून दोन कोटींचा निधी.
तिर्थक्षेत्राचा ‘ क’ वर्ग दर्जा प्राप्त जवळेश्वर मंदिर व परिसरातील विविध विकास कामांसाठी सन २०१६ ला पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत १ कोटी ५२ लाखांचा निधी तत्कालिन पर्यटन राज्यमंत्री आमदार प्रा.राम शिंदे यांनी मंजूर केला होता. या निधीतून सभामंडप, ध्यानमंदिर, संरक्षक भिंत,व्यापारी संकुल, रथयात्रा मार्ग ही कामे करण्यात आली आहेत. यानंतर यावर्षी पर्यटन विभागामार्फत मंदिर परिसरात भक्तनिवास बांधणेसाठी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.