अखेर साडेतीन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश, कर्जत व जामखेड वनविभागाची मोठी कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना आज सकाळी 10 वाजता उघडकीस आली होती. कर्जत व जामखेड वनविभागाच्या संयुक्त पथकाने साडेतीन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवत विहीरीत पडलेल्या बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्याची मोठी कारवाई पार पाडली. जामखेड तालुक्यात गेल्या अडीच तीन वर्षांपासून बिबट्या सक्रीय असल्याचे सातत्याने निदर्शनास येत होते. वनविभागाने पहिल्यांदा जामखेड तालुक्यात जिवंत बिबट्या पकडण्याची पहिली घटना आज घडली आहे. वनविभागाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Finally after three and a half hours success in imprisoning the leopard, major action of Karjat and Jamkhed forest department

जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे आज सकाळी दहा वाजता नवनाथ पारे व तात्याराम निगुडे यांच्या समाईक विहिरीत बिबट्या पडला असल्याचे निदर्शनास आले होते. सदर बिबट्या हा विहीरीच्या कडेला असलेल्या कपारीत बसून होता. सुदैवाने विहिरीला कपार असल्याने बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नाही. विहीरीत बिबट्या पडल्याचे आढळून येताच गावातील नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी विहीरीकडे धाव घेतली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान गावातील नागरिकांनी व सरपंच अंकुश शिंदे यांनी सदर घटनेची माहिती वनविभाग व आमदार प्रा.राम शिंदे यांना कळवली होती.

अरणगाव येथील नवनाथ पारे व तात्याराम निगुडे यांच्या समाईक विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती सरपंच अंकुश शिंदे यांनी आमदार प्रा राम शिंदे यांना कळवताच आमदार प्रा राम शिंदे यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत सदर बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पिंजरा लावण्याचे आदेश दिले होते. वनविभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कर्जत व जामखेड वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले होते.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. विहीरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर जिवंत बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती. रेस्क्यू ऑपरेशन राबवताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जामखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन राबवल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके म्हणाले की, सदर बिबट्या हा काल रात्री विहीरीत पडला असण्याची शक्यता आहे. सदर बिबट्या अंदाजे दीड ते दोन वर्षाचा आहे. बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे, असे शेळके म्हणाले.

दरम्यान, अरणगाव शिवारातील विहीरीत पडलेल्या बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली व सरपंच अंकुश शिंदे,लहू शिंदे व इतर ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्याने वनपाल राजेंद्र भोसले, वनपाल सुरेश भोसले, वनरक्षक प्रविण ऊबाळे, आजिनाथ भोसले, रवि राठोड वनकर्मचारी श्याम डोंगरे, शिवाजी चिलगर,राघु सुरवशे, महेश काळदाते,शरद सुर्यवंशी, हरिश्चंद्र माळशिखारे, संजय अडसूळ, सुभाष धनवे, सह आदींनी विशेष मेहनत घेतली.

जामखेड तालुक्यात गेल्या अडीच तीन वर्षांपासून बिबट्या सक्रीय असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. खर्डा, नायगाव, धामणगाव, जातेगाव, जवळा सह आदी भागात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. आता अरणगाव येथे विहीरीत जिवंत बिबट्या आढळून आला.  त्याला वनविभागाने जेरबंद केले खरे पण जामखेड तालुक्यात बिबट्या सक्रीय असल्याचे आता अधोरेखित झाले आहे. नागरिकांनी विशेषता: शेतकरी बांधवांनी रात्रीच्या वेळी सतर्कता बाळगावी. वनविभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे अवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.