भाकीतांच्या पावसाचा महापुर, पंधरवडा कोरडा, पेरण्या खोळंबल्या, पाऊस कुठे हरवला ? जामखेड तालुक्यातील बळीराजा हैराण !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार आगमन होणार, येत्या 48 तासांत धो धो बरसणार, अमूक तारखेपासून राज्यात पाऊस सक्रीय होणार, अश्या भाकीतांचा महिनाभरापासून महापुर आला खरा, पण पावसाळी हंगामातील पहिला पंधरवडा कोरडाच गेला. पावसाबाबतचे सर्वांचेच अंदाज खोटे ठरले.चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाची मात्र निराशा झाली आहे.
राज्यात जूनच्या प्रारंभीपासूनच पाऊस दमदार हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता, दरवर्षी मान्सून आधी होणारा मान्सूनपूर्व पाऊस मोजक्याच भागात कोसळला. वेळेआधी मान्सून केरळात दाखल झाल्याचेही जाहीर करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखलही झाला होता परंतू त्याही भागातून पाऊस गायब झाला आहे. उत्तरेकडे सरकणारा पाऊसही गायब झाला आहे. त्यामुळे पाऊस नेमका गेला कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी राज्यातील अनेक भागात हंगामाची सुरूवात कोरडी झाली आहे. यामुळे राज्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. चिंताग्रस्त शेतकरी बांधवांच्या नजरा अकाशाकडे लागल्या आहेत.
समुद्रातील बाष्पयुक्त वारे अधिक दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे भूभागाकडे येतात. त्यासाठी आवश्यक अधिक उंचीची कमी दाबाची क्षेत्रे आणि चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा सध्या अभाव आहे. त्यामुळेच समुद्रातील बाष्प येण्यात अडचणी निर्माण होत असून, पावसाचे प्रमाण कमी असल्याचे हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.
आगामी पाच दिवसांत राज्यात पाऊस सक्रीय होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला आहे. जोवर दमदार पाऊस पडत नाही, तोवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे अवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
जामखेड तालुका कोरडाच
दरवर्षी जामखेड तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असतो, त्या जोरावर तालुक्यात पेरण्या होतात, परंतु यंदा मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील काही भागात जेमतेम हजेरी लावली. आधीच पर्जन्य छायेच्या प्रदेश अशी जामखेडची ओळख आहे. यंदा पावसाळ्याच्या प्रारंभी पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. सध्या कडक ऊन, जोराचे वारे आणि बळीराजाचे आकाशाकडे डोळे अशी परिस्थिती आहे.