घंटागाडीमुळे जवळ्यातील कचरा समस्येवर होणार मात, आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार घंटागाडीचे लोकार्पण आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील जवळा गावच्या युवा सरपंच वैशाली शिंदे आणि उपसरपंच रोहिणी वाळूंजकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आज 15 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या सोहळ्यासाठी जवळा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते प्रशांत शिंदे यांनी केले आहे.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात जवळा ग्रामपंचायतला मोठे महत्व आहे. जवळा ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली शिंदे आणि उपसरपंच रोहिणी वाळूंजकर यांच्या नेतृत्वाखाली जवळ्यात विकास कामांचा धडाका सुरु आहे. जवळा गाव स्वच्छ सुंदर आणि कचरामुक्त असावे यासाठी सरपंच वैशाली शिंदे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतच्या वतीने 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावासाठी घंटागाडी आणि डस्टबीन खरेदी करण्यात आले आहेत. याचे लोकार्पण आज 15 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.
जवळ्यातील कचऱ्याच्या समस्येवर कायम स्वरूपी मात करण्यासाठी जवळा ग्रामपंचायतने घंटागाडी खरेदी केली आहे. यामुळे गावातील कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे. यातून जवळ्याची वाटचाल कचरामुक्तीच्या दिशेने होणार आहे. जवळा ग्रामपंचायतने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते जवळा गावातील चांभारवाडा गावठाण परिसरात स्ट्रीट लाईट, भीमनगर भागात होणारा सिमेंट काँक्रीट रस्ता, तसेच गोयकरवाडी येथे 25/15 योजनेतून काँक्रिट रस्ता, तसेच घनकचरा व्यवस्थापन या कामांचे तसेच घंटागाडी आणि डस्टबीन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील वाॅल कंपाउंड, विठ्ठल मंदिर ते वडारवाडा सिमेंट रस्ता, प्रदीप दळवी घर ते डाॅ खेत्रे घर सिमेंट रस्ता या कामांचे लोकार्पण होणार आहे.
जवळा ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली शिंदे आणि उपसरपंच रोहिणी वाळूंजकर यांना सर्व ग्रामपंचायत सदस्यांची मोलाची साथ लाभत असल्यामुळे जवळा ग्रामपंचायतचे काम तालुक्यात नेहमी चर्चेत राहत आले आहे. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता जवळ्यात विविध विकास कामांचे धुमधडाक्यात भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न होणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन जवळा ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे.