जामखेड टाईम्स वृत्तसेवा । मुंबई | केंद्र सरकारकडून राज्यातील ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून येणारा निधी शाश्वत विकास कामांसाठीच खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी राज्यातील सरपंचांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे लक्ष वेधले आहे. सरपंच परिषदेने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध केला आहे. राज्यातील सरपंचांच्या या भूमिकेमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हाती मात्र आयतेच कोलीत मिळाल्याने राज्यपाल विरूध्द सरकार असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Opposition to Thackeray government’s decision: These demands made by the Sarpanch of the state to the Maharashtra Governor)
राज्यातील सरपंचांचे प्रतिनिधीत्व करणार्या सरपंच परिषद या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या नेतृत्वाखाली १४ सदस्यीय शिष्टमंडळाद्वारे नुकतीच महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत पंधराव्या वित्त आयोगाचा निधी शाश्वत विकास कामांसाठी खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी केली होती. यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांशी विविध मागण्यांवर व विषयांवर चर्चा केली.
ग्रामपंचायत ही स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीच्या निर्णयानुसार केंद्र आणि राज्यसरकार यांच्याकडून आलेला निधी गावच्या मागणी, गरजेनुसार आणि ग्रामसभेतील निर्णयानुसार खर्च होणे अपेक्षीत आहे. मात्र ग्रामपंचायतींना येणाऱ्या १५ व्या. वित्त आयोगातील निधीला राज्य सरकारने वेगवेगळी परिपत्रके काढून तो निधी शाश्वत कामापेक्षा कॉम्प्युटर ऑपरेटर मानधन, लाईट बील, हातपंप दुरुस्ती,कर सल्लागार एजन्सी या सह अन्य बाबीवर खर्च करण्याचे आदेश काढल्याने या निधीतून गावचा विकास होत नाही. त्यामुळे केंद्राने दिलेल्या निर्देशानुसारच हा निधी खर्च करण्यात यावा अशी भूमिका सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी मांडली आहे.
या आहेत सरपंच परिषदेच्या मागण्या
1) १५ व्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्धनिधी केवळ विकास व पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात यावा
2) मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी.
3) करोनामुळे निधन झालेल्या राज्यातील 35 सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत मिळावी. यासह विविध 12 मागण्या सरपंच परिषदेने राज्यपालांकडे केल्या आहेत.
यावेळी सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव, विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव, किसन जाधव,अविनाश आव्हाड, अश्विनीताई थोरात, आरुणभाऊ कापसे, संजय जगदाळे शत्रुघ्न धनवडे विठाबाई वनवे वनिताताई सुरवसे, अनिकेत घाडगे, अंजलीताई ढेपे, मनीषाताई यादव, प्रा लक्ष्मण ढेपे यांच्यासह आदी सरपंच उपस्थित होते.