दिवंगत नेत्यांच्या कौटुंबिक वारसदारांच्या नेतृत्वावर जवळेकरांचे शिक्कामोर्तब! 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जेष्ठ नेते स्वर्गीय श्रीरंग भाऊ कोल्हे यांच्या पश्चात पार पडलेल्या जवळा सोसायटी निवडणूकीत कोल्हे यांच्या विचारांचा पॅनल विजयी झाला. सोसायटी निवडणूकीत जवळेकरांनी दिवंगत नेत्यांच्या कौटुंबिक वारसदारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले, त्यामुळे जवळ्याच्या राजकारणात स्वर्गीय श्रीरंग भाऊ कोल्हे यांचा गट जिवंत तर राहिलाच शिवाय अधिक मजबूत झाल्याचे दिसत आहे. 

जवळ्याच्या राजकारणात स्वर्गीय श्रीरंग भाऊ कोल्हे यांची नेहमीच महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हे यांच्या भोवतीच जवळा गावचे राजकारणात फिरत राहिले आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी देणे हे कोल्हे यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. कोल्हे यांच्या राजकीय तालमीत अनेक नेते कार्यकर्ते घडले. मागील वर्षी जेष्ठ नेते श्रीरंग भाऊ कोल्हे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात प्रथमच यंदा सोसायटी निवडणूक पार पडली. 

यंदा पार पडलेल्या सोसायटी निवडणूकीत स्वर्गीय श्रीरंग भाऊ कोल्हे यांचे चिरंजीव दत्ताभाऊ कोल्हे यांनी गावच्या राजकारणात लक्ष घातले. गावातील सर्वच गटांची एकत्रित मोट बांधून दत्ताभाऊ कोल्हे यांनी निवडणूक हातात घेतली. शांत, संयमी आणि अभ्यासू अशी ओळख असलेल्या दत्ताभाऊ कोल्हे यांच्या नेतृत्वावर जवळेकरांनी विश्वास दाखवला आणि सोसायटीची सत्ता त्यांच्या ताब्यात दिली. 

दिवंगत जेष्ठ नेते श्रीरंग भाऊ कोल्हे यांच्यानंतर कोण ? या प्रश्नाचे उत्तर जवळेकरांनी यंदाच्या सोसायटी निवडणूकीत दिले आहे. दत्ताभाऊ कोल्हे यांच्या नेतृत्वावर जवळेकरांनी विश्वास दाखवला. दत्ताभाऊ कोल्हे यांच्या माध्यमांतून जेष्ठ नेते श्रीरंग भाऊ कोल्हे यांचा कौटुंबिक राजकीय वारसा आणि विचार जवळ्याच्या राजकारणात जिवंत राहणार असल्याचे सोसायटी निवडणूकीतून अधोरेखित झाले.तसेच स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांचाही राजकीय विचार जवळ्याच्या राजकारणात जिवंत राहिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत स्वर्गीय जेष्ठ नेते श्रीरंग भाऊ कोल्हे यांच्या गटाची निर्णायक ताकद राहिलेली आहे. विशेषता : याचा मोठा प्रभाव जवळा जिल्हा परिषद गटावर राहिलेला आहे. कोल्हे गटाचा ज्या पक्षाला आशिर्वाद राहिलेला आहे, त्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत नेहमी मोठा राजकीय फायदा झालेला आहे. येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत कोल्हे गटाची भूमिका निर्णायक राहणार आहे. यात कोल्हे गट कोणाला आशिर्वाद देणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यंदाच्या जवळा सोसायटीच्या निवडणूकीत कोल्हे गटाचे नेते दत्तात्रय कोल्हे यांच्या साथीला माजी सभापती दिपक पाटील, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, शहाजी (आप्पा) पाटील, डाॅ महादेव पवार, आरडी ग्रुपचे राजेंद्र पवार, डाॅ दिपक वाळूंजकर, दशरथ हजारे गुरूजी, राजेंद्र राऊत, प्रदीप दळवी, संतराम सुळ, प्रशांत पाटील, केशव कोल्हे सह आदी नेते होते. 

अजिनाथ हजारे ठरले किंग मेकर

जवळा सोसायटी निवडणुकीत ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे यांनी निवडणूक काळात राबवलेली प्रचार यंत्रणा लक्षवेधी ठरली. शेतकरी विकास आघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयात हजारे यांची भूमिका निर्णायक ठरली. उमेदवार निवड, प्रचार यंत्रणा, मतदारांचे नियोजन यावर हजारे यांचा प्रभाव होता. जवळा सोसायटी निवडणुकीत अजिनाथ हजारे किंगमेकर ठरले.