Gram Panchayat Election 2023 : जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीत लवकरच उडणार निवडणूकीचा धुराळा, गावपुढारी लागले कामाला !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Gram Panchayat Election 2023 : जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी, मुंजेवाडी-खुटेवाडी तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील महिन्यात या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मतदारयाद्यांवर आलेल्या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक होऊ घातलेल्या या गावांमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी व विरोधक आपले गट मजबूत करण्यासाठी सरसावले आहेत. निवडणुकीमुळे तिन्ही ग्रामपंचायतींचे राजकीय वातावरण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या जवळा ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 15 सदस्य संख्या असलेल्या जवळा ग्रामपंचायतचे सरपंचपद यंदा जनतेतून निवडले जाणार आहे. यंदा जवळा ग्रामपंचायतचे सरपंचपद SCराखीव आहे. यंदा होणाऱ्या निवडणुकीसाठी जवळा गावात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. इच्छूक उमेदवार व पॅनल प्रमुखांनी प्रत्येक प्रभागात बैठकांचे सत्र हाती घेतले आहे.
काही इच्छूक उमेदवारांनी अत्तापासूनच खर्च सुरू केला आहे. सोशल मीडियावर इच्छुकांनी बॅनरबाजी हाती घेतलीय. जवळ्यात होणारी निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. निवडणुक जवळ येऊन ठेपल्यामुळे जवळा गावात बैठकांचा जोर वाढला आहे.गावपुढारी तगड्या उमेदवारांच्या शोधासाठी कामाला लागले आहेत. गुप्त बैठकांमधून बेरजेच्या राजकारणाची चाचपणी सुरू झाली आहे. युत्या-आघाड्यांची गोळाबेरीज सुरू झाली आहे.
जवळा ग्रामपंचायत बरोबरच मतेवाडी व मुंजेवाडी -खुटेवाडी या ग्रामपंचायतांची निवडणूक होणार आहे.दोन्ही ग्रामपंचायतींची सात-सात सदस्य संख्या आहे. मतेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तर मुंजेवाडी – खुटेवाडीचे सरपंच ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पॅनल जुळवाजुळव व उमेदवार निवडीसाठी गावपुढारी सरसावले आहेत.
सप्टेंबरमध्ये उडणार ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा
जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी, मुंजेवाडी-खुटेवाडी तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने गावपुढारी कामाला लागले आहेत. प्रशासनाकडून तिन्ही ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळा ग्रामपंचायतवर कोणाचा होणार कब्जा?
जामखेडच्या राजकारणात जवळा गावाची नेहमी निर्णायक भूमिका राहिलेली आहे. जवळा ग्रामपंचायतवर वर्चस्व असणाऱ्या गटाचे तालुक्याच्या राजकारणात नेहमी बोलबाला राहिलेला आहे. त्यामुळे जवळा ग्रामपंचायतवर कब्जा मिळवण्यासाठी मातब्बर गावपुढारी सरसावले आहेत. या निवडणुकीत अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत. जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत तगडे पॅनल रिंगणात उतरवून गावपुढारी राजकीय धुराळा उडवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत.गावपुढारी आपला गट मजबूत व्हावा यासाठी रूसवे-फुगवे- नाराजी दुर करण्यासाठी सरसावले आहेत.येत्या निवडणुकीत जवळा ग्रामपंचायतवर कोण कब्जा मिळवणार याकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे.