जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुक कार्यक्रमांची घोषणा, इच्छूकांनो लागा कामाला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे डोळे लावून बसलेल्या गावपुढारी व इच्छुकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज 3 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी व मुंजेवाडी – खुंटेवाडी या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामुळे आता ऐन ऑक्टोबर हिटमध्ये महाराष्ट्रासह जामखेड तालुक्याचे राजकीय वातावरण तापताना दिसणार आहे.

Announcement of election programs of three village panchayats in Jamkhed taluka, aspirants get to work, jawala, matewadi, munjewadi - khuntewadi, jamkhed latest news,

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) मधील कलम १० अ पोटकलम ( ४ ) मधील अधिकारांचा वापर करुन, राज्यातील सुमारे २३५९ ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे सदस्य / थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या २०६८ ग्रामपंचायतीतील २९५० सदस्यांच्या व १३० थेट सरपंचांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे.

माहे 2023 ते माहे डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये जवळा, मतेवाडी व मुंजेवाडी- खुंटेवाडा या तीन ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज 3 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झाला आहे. त्यानुसार या निवडणूक कार्यक्रमांची नोटीस 6 ऑक्टोबर 2023 रोजी तहसीलदार जामखेड यांच्याकडून नोटीस प्रसिध्द केली जाणार आहे.

16 ऑक्टोबर 2023 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. 23 ऑक्टोबर 2023 रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 25 ऑक्टोबर 2023 या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होईल तर मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.

जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वपूर्ण असलेल्या जवळा ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 15 सदस्य संख्या असलेल्या जवळा ग्रामपंचायतचे सरपंचपद SC साठी राखीव आहे. जनतेतून सरपंचपद निवडले जाणार आहे. सरपंचपदासाठी अनेक जण इच्छूक आहेत. परंतू परंपरागत दोन तगड्या पॅनलमध्ये यंदाची निवडणूक होणार आहे. दोन्ही पॅनलकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत. युती – आघाडी फिस्कटल्यास ऐनवेळी तिसरा पॅनल तयार होऊ शकतो.यंदा होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून जवळा गावात मोठ्या राजकीय उलथापालथी सुरु आहेत.

इच्छूक उमेदवार व पॅनल प्रमुखांनी प्रत्येक प्रभागात बैठकांचे सत्र हाती घेतले आहे.काही इच्छूक उमेदवारांनी महिनाभरापासून खर्च सुरू केला आहे. सोशल मीडियावर इच्छुकांनी बॅनरबाजी हाती घेतलीय. कधी कोणाच्या सुख दु:खात न दिसणारे अचानक जनतेला ख्याली खुशाली विचारताना दिसत आहेत.जवळ्यात होणारी निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे जवळा गावात बैठकांचा जोर वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून थंडावलेल्या घडामोडी आता पुन्हा गतिमान होऊ लागल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होताच इच्छूक उमेदवार पुन्हा सक्रीय झाले आहेत.

जवळा ग्रामपंचायत बरोबरच मतेवाडी व मुंजेवाडी -खुटेवाडी या ग्रामपंचायतांची निवडणूक होणार आहे. दोन्ही ग्रामपंचायतींची सात-सात सदस्य संख्या आहे. मतेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तर मुंजेवाडी – खुटेवाडीचे सरपंच ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पॅनल जुळवाजुळव व उमेदवार निवडीसाठी गावपुढारी सरसावले आहेत.

जवळा ग्रामपंचायतवर कोणाचा कब्जा ?

जामखेडच्या राजकारणात जवळा गावची नेहमी निर्णायक भूमिका राहिलेली आहे. जवळा ग्रामपंचायतवर वर्चस्व असणाऱ्या गटाचे तालुक्याच्या राजकारणात नेहमी बोलबाला राहिलेला आहे. त्यामुळे जवळा ग्रामपंचायतवर कब्जा मिळवण्यासाठी मातब्बर गावपुढारी सरसावले आहेत. या निवडणुकीत अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत. जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत तगडे पॅनल रिंगणात उतरवून गावपुढारी राजकीय धुराळा उडवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत.येत्या निवडणुकीत जवळा ग्रामपंचायतवर कोण कब्जा मिळवणार याकडे संपुर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.