जामखेड : ई-पीक पाहणी संदर्भात प्रात्यक्षिकातून अरणगाव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन, हळगाव येथील कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांचा पुढाकार !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व विस्तार शिक्षण विभाग अंतर्गत ई-पिक पाहणीचे प्रात्यक्षिक सादर केले. 20 ऑगस्ट 2023 रोजी हा कार्यक्रम अरणगाव येथे पार पडला.
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी नुकतीच भेट दिली. या भेटीत त्यांनी पिक विम्या संबंधी गावात सर्वे केला. शेतकऱ्यांना पिकविमा संबंधी अनेक अडचणी येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नव्हती.त्यात त्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या.
या सर्व बाबी समोर आल्यानंतर कृषीदुतांनी ई पीक पाहणी संदर्भात प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना ज्या अडचणी येत आहेत. त्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. ई-पीक पाहणीचे व्हर्जन 2 (सुधारीत) गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे असे आवाहन यावेळी कृषिदूतांनी शेतकऱ्यांना केले.
ई पीक पाहणी प्रात्यक्षिकात कृषिदुत यश अहिरे, साईकिरण अटपलवार,अमेय बागले , ऋत्विक बानकर, सुशांत बिराजदार, विवेक चांदेवार आणि किरण चव्हाण यांनी अरणगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात ई-पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मदत केली. कृषिदुतांनी हाती घेतलेल्या या उपक्रमांचे कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी तलाठी सुर्यकांत सरोदे तसेच कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सखेचंद अनारसे, केंद्र प्रभारी डॉ.दत्तात्रय सोनवणे, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ.मनोज गुड,कार्यक्रम अधिकारी डॉ.नजीर तांबोळी आणि विषयतज्ञ डॉ.प्रणाली ठाकरे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .