जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील हळगाव येथील श्री भैरवनाथ यात्रोत्सवास आजपासून सुरूवात झाली. कोरोनानंतर होत असलेल्या या यात्रोत्सवात ग्रामस्थांचा मोठा उत्साह दिसून आला. यात्रोत्सव शांततेत सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील श्री भैरवनाथ देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे. यात्रेसाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातील भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने यात्रेसाठी हजेरी लावत असतात. कोरोना नंतर यंदा होत असलेल्या भैरवनाथ यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यात्रेत भाविकांसह ग्रामस्थांचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
आज पहाटे श्री भैरवनाथास अभिषेक घालून यात्रोत्सवास सुरूवात झाली. त्यानंतर 9 ते 11 काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर दुपारी 4 नंतर गावातील मानाच्या शेरण्यांना सुरूवात झाली. डिजेच्या तालावर शेरण्या भैरवनाथ मंदिर परिसरात येत होत्या, मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता, पाव्हणे – रावळे, गावकरी, लेकी बाळींनी ग्रामदैवत भैरवनाथांचे दर्शन घेतले. ज्यांनी नवस केले होते त्यांनी नवस फेडले.
भैरवनाथ यात्रोत्सव समितीच्या वतीने रात्री गावकऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी मैदान होणार आहे.
दरम्यान यात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक अजय साठे, पोलिस काँस्टेबल नवनाथ शेकडे, बाळासाहेब तागड, सतिश दळवी, पोलिस पाटील सुरेश ढवळे हे कडक बंदोबस्त करत आहेत.