जनावरांचा गोठा स्वच्छ कसा ठेवावा ? काय काळजी घ्यावी ? प्रात्यक्षिकातून कृषिदूतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग अंतर्गत जनावरांचा गोठा स्वच्छ कसा ठेवावा ? काय काळजी घ्यावी ? याचे प्रात्यक्षिक कृषिदुतांनी शेतकऱ्यांना करून दाखविले. हा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील साकत येथे पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ( होस्ट फार्मर ) शेतकऱ्याचे सहाय्य घेऊन व विविध अवजारे वापरून गोट्याची स्वच्छता केली. खोऱ्याच्या साह्याने गाईचे शेण एका एका टोपलीमध्ये भरले. जमिनीवर पडलेल्या मलमूत्राची पाणी फवारणी यंत्राद्वारे स्वच्छता केली. यावेळी गोठ्यामध्ये असलेल्या गाईंची ही स्वच्छता करण्यात आली. यावेळी विविध औषधांचा वापर करण्यात आला.
गोठ्यातील वातावरण जास्त वेळ ओलसर राहिल्यास, अशा ठिकाणी जिवाणू, विषाणू आणि परोपजीवींची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हे सर्व टाळण्यासाठी गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा. पावसाळा सुरु होण्यापूर्वी गोठ्याचे छप्पर दुरुस्त करून घ्यावे, अश्या सुचना यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिल्या.
पाऊस उघडल्यावर जनावरे सकाळी बाहेर सूर्यप्रकाशात बांधावीत. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावताना संपूर्ण गोठा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा, असे केल्याने गोठ्यातील माशांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. गोठ्यात जनावरे बसण्याच्या जागेवरील सर्व खाचखळगे मुरूम टाकून व्यवस्थित भरून घ्यावेत. जनावरे बसण्यासाठी मॅटचा वापर करावा. गोठ्यातील अमोनिया बाहेर जाऊन हवा खेळती राहील, याकडे लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी गोठ्यातील गव्हाणी, पाण्याचा हौद व गोठ्यामध्ये सर्वत्र चुना मारून घ्यावा. पावसाळ्यात गोठ्यांमध्ये पावसाचे पाणी येणार नाही व जनावरे भिजणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगत विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना गोठा स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
गोठा स्वच्छतेचे प्रात्यक्षिक कृषिदूत महेश जाधव, साईप्रसाद गुट्टे, योगेश जाधव, अक्षय गुंजाळ, सुमित डोके,अंशुल खाकरे ,स्वप्निल ढेकळे यांनी प्रात्यक्षिक सादर केले व शेतकऱ्यांना याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. के. ससाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. ए. अनारसे, डॉ.निकिता धाडगे मॅडम, डॉ. एन. डी. तांबोळी, आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.