मला माहित आहे ना… तुम्हाला तुमच्या मुलाचा, साहेबांचा खूप अभिमान आहे, आशाताई शिंदेंनी साधला महिलांशी भावनिक संवाद
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। आपण काय म्हणतो भावकीचे भांडणं झाले, शेजार्याचं जमत नाही, त्यांचं आपल्यावाचून राहतं का? कुणाचचं कोणावाचून राहत नाही, आपल्याला माहितीय का ? आपण किती दिवस जगणारेत, त्याच्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागा, राग द्वेष, निराशा काही कामाची नाही, ऐकमेकांविषयी मनात तिरस्कार असेल तर तो काढून टाका, चांगल्या मनाने जगा, असा मोलाचा सल्ला यावेळी माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी उपस्थित महिलांना दिला.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी सभापती आशाताई राम शिंदे यांच्या हस्ते महिला बचत गटांना 20 लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार राम शिंदे आणि माजी सभापती आशाताई राम शिंदे यांच्या वतीने उपस्थित महिलांना वाण म्हणून समई भेट देण्यात आली. तर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनिषाताई मोहळकर यांच्या वतीने बकेट भेट देण्यात आली. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, यावेळी पुढे बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, महिलांनो बचत गटाच्या माध्यमांतून संघटीत व्हा, त्यामाध्यमांतून मिळणाऱ्या पैश्यातून मुलांचे शिक्षण पुर्ण करा, माझा नवरा आमदार झाला, मंत्री झाला पण मी फक्त मुलांना शिकवण्यावर भर दिला. तुम्ही सुध्दा तुमच्या मुलांना शिकवा, कारण तुम्ही आज जे भोगता ते तुमच्या मुलांनी परत भोगलं नाही पाहिजे, मुलं जर शिकली तर तुमच्या पुढच्या पिढ्यांचे आयुष्य सुधारेल, त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी बचत गटांचा वापर करून घ्या, असे भावनिक अवाहन जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी केले.
शिंदे पुढे म्हणाल्या की,आपण असं म्हणतो की काही नाही करू शकतं, पण आपण काहीही करू शकतो, आपल्यात तेवढी हिम्मत असते, आपण सगळं करू शकतो, बदल स्वीकारणं माणसाचा स्वभाव पाहिजे, बदल हा अचानक आपण करू शकत नाही, मला त्याचा अनुभव आहे, पण तुम्ही तुमची मानसिकता बनवा, तुम्हाला घराच्या बाहेर थोडा वेळ काढावा लागेल, तुमच्या घरासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, त्याच्यातूनच आपला फायदा आहे, तुमच्या फायद्यासाठी तुमचं संघटन मजबूत ठेवा, असे अवाहन त्यांनी केले.
आईला म्हणा, बहिणीला म्हणा, आपल्या मुलाला किंवा भावाला मोठं झालेलं कोणाला बघायला आवडणार नाही, मला माहित आहे ना, तुम्हाला तुमच्या मुलाचा, साहेबाचा खूप अभिमान आहे, कारण आपण जेव्हा बाहेर गावी जातो तेव्हा आपण म्हणतो की आम्ही चोंडीचेत, तेव्हा लोकं तुम्हाला विचारत्येत, शिंदे साहेबांच्या गावच्येत का ? तेव्हा आपण अभिमानाने सांगतोत की हो, मी त्यांची चुलतीय, मी त्यांची भावजयीय, अगदी आम्ही घरातले आहोत, आमच्या जवळचे आहेत, शेजारीत, आमचे खूप स्नेहाचे संबंध आहेत, आपण बोलतो ना? त्यात काय तुम्हाला मतदान करायचं असतं का ? तर नाही, असे म्हणत आशाताई शिंदे यांनी चोंडीतील महिलांशी भावनिक संवाद साधला. यावेळी आशाताई शिंदे यांनी साधलेल्या भावनिक संवादाने उपस्थित महिला वर्ग चांगलाच भारावून गेला होता.