जामखेड टाइम्स वृत्तसेवा। संपुर्ण जामखेड तालुक्यात गाजत असलेल्या राजुरी, रत्नापुर आणि शिऊर या तीन ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या, आता छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. उमेदवारांसाठी आज आणि उद्याची रात्र कत्तलची रात्र ठरणार आहे. रात्रीतून कोण फुटणार ? कोण कोणाला मदत करणार ? यासाठीची रणनिती राबवली जाणार आहे. यामुळे फोडाफोडीचे राजकारण तापताना दिसणार आहे.
जामखेड तालुक्यातील राजुरी, रत्नापुर आणि शिऊर या तीन ग्रामपंचायतींसाठी रविवार दि 18 रोजी मतदान होणार आहे. तीनही ग्रामपंचायतीमध्ये जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. यंदा तीनही ग्रामपंचायतीत निवडणूक अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडत आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रचार काळात आरोप – प्रत्यारोपांनी तीनही गावचे राजकारण चांगलेच तापले होते. प्रचाराच्या दुसर्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी व्यक्तीगत गाठीभेटीवर भर देत जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. प्रचार थंडावला असला तरी आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे.
रत्नापुर, शिऊर आणि राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी विरूध्द भाजप असाच सामना तीन्ही ग्रामपंचायतीत रंगला आहे.अगामी दोन दिवस फोडाफोडीचे राजकारण अधिक रंगणार आहे. याकाळात कोणता पॅनल फोडाफोडीत यशस्वी होतो, त्यावर त्या पॅनलचा विजय अधिक सुकर होणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला खो घालण्यासाठी विरोधकही डाव प्रतिडाव टाकून राजकीय खेळ्या खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे अगामी दोन दिवस तीनही ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात राजकीय गरमागरमी पहायला मिळणार आहे.
दरम्यान, राजुरी, रत्नापुर आणि शिऊर ग्रामपंचायत निवडणुक काळात शांतता भंग होऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणुक काळात सर्वांनी शांतता राखून खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुक पार पाडावे असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.