जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिघोळ – माळेवाडी रस्त्यावरील अमराई ओढ्यावरील नुकत्याच पडलेल्या नव्या पुलाच्या निकृष्ट कामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ॲड शमा हाजी शेख यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसिलदार योगेश चंद्रे यांनी पंतप्रधान सडक योजनेचे कार्यकारी अभियंता अहमदनगर यांना सदर रस्त्याची चौकशी करून तातडीने अहवाल मागवला आहे.
जामखेड तालुक्यातील दिघोळ – माळेवाडी या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेतून काम सुरु आहे. या भागात आमराई ओढ्यावर दोन ते तीन महिन्यांपुर्वी नव्या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसाने हा पुल पडला. ठेकेदार व संबंधित आधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमताने झालेले निकृष्ट दर्जाचे काम पावसाने उघडे पाडले.
‘ज्या’ ठेकेदाराने संबंधित काम केले होते ‘त्या’ ठेकेदाराच्या अनेक कामांची हिच बोंब आहे. ‘त्या’ ठेकेदाराने अनेक ‘निकृष्ट’ दर्जाची कामे केली आहेत. आजवर सातत्याने अधिकाऱ्यांनी ‘त्या’ ठेकेदाराला पाठाशी घातल्यामुळे तसेच राजकीय वरदहस्तामुळे तो ठेकेदार कोणालाही जूमानत नसल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत सुविधा मिळावी यासाठी सरकारकडून कोट्यावधीचा निधी दिला जात, मात्र ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट यूतीमुळे झालेल्या विकास कामांचा निकृष्ट दर्जा दोन तीन महिन्यातच उघडा पडतो. अश्याच स्वरूपाची घटना दिघोळ- माळेवाडी रस्त्यावरील नव्या पुलाच्या बाबतीत घडली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुल पडला आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी ॲड शमाहाजी शेख यांनी जामखेड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कार्यकारी अभियंत्यांना गांभीर्य नाही
मुख्यमंत्री सडक योजनेचे अहमदनगर विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत सानप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, डेप्युटी इंजिनिअरला पाहणी करण्यासाठी सांगितले आहे.अहवाल आल्यानंतर पाहू, असे वेळकाढु पणाचे उत्तर दिले. पुल पडुन आठ दिवस झाले तरी अजुनही या भागात एकही अधिकारी फिरकलेला नाही. संबंधित ठेकेदाराच्या भ्रष्ट कामामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांना येण्या जाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाचा करोडो रुपयांची निधी पाण्यात गेला की ठेकेदाराच्या खिशात? याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जामखेड तालुक्यात निकृष्ट कामे झाल्याची बोंब ठोकून एका पक्षाने मध्यंतरी मोठे रान पेटवले होते.आता दिघोळमधील त्या पुलाच्या निकृष्ट कामावर, त्या पक्षाचे कार्यकर्ते का बोंबा ठोकत नाहीत ? असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे. ‘आपला तो बाबू, दुसर्याचं ते कार्ट’ अशीच राजकीय कार्यकर्त्यांची भूमिका तर नाही ना ? हा सवाल मात्र आता उपस्थित होऊ लागला आहे. तसेच सत्ताधारी गटानेही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे जनतेत नाराजी पसरली आहे.